मीटर रिकॅलिब्रेट न केलेल्या रिक्षा-टॅक्सींना प्रीपेड व्यवसाय करण्यासही आता प्रतिबंध करण्यात येणार आहे. अशा वाहनांना प्रवासी भाडे देऊ नये अशा आशयाचे आदेश प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आले आहेत. मीटर रिकॅलिब्रेट न झालेल्या वाहनांवरील कारवाई मंगळवारीही सुरू होती. या कारवाईअंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रातील नवी मुंबई, कल्याण आणि वसई आदी भागामध्ये रिक्षा जप्त करण्याचे प्रमाण अधिक आहे.
रिक्षा-टॅक्सी इ-मीटर रिकॅलिब्रेशनची मुदत संपल्यानंतर, रिकॅलिब्रेट न करता व्यवसाय करणाऱ्या वाहनांवर परिवहन विभागाने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. रिकॅलिब्रेट न झालेल्या वाहनांना प्रीपेड व्यवसायही करू देऊ नये, असे आदेश ताडदेव प्रादेशिक परिवहन विभागाने दिले आहेत. दादर, मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे रेल्वे स्थानकाबाहेर प्रीपेड टॅक्सी स्टॅण्ड आहेत. तेथे अशा टॅक्सीचालकांना वगळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे विमानतळावरील प्रीपेड रांगांमधील रिक्षा-टॅक्सींच्या मीटर कॅलिब्रेशनची तपासणी केल्याशिवाय त्यातून प्रवाशांना प्रवास करू देऊ नये, असेही परिवहन विभागातर्फे सांगण्यात आले आहे. मॅकॅनिकल मीटरच्या रिकॅलिब्रेशनसाठीची मुदत ३१ जानेवारी २०१३ पर्यंत असल्याने सध्या केवळ इ-मीटर लावलेली वाहनेच तपासण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.