अभिनेता सलमान खान विरुद्ध सदोष मनुष्यवधाच्या आरोपाअंतर्गत सुरू असलेल्या खटल्यात वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांनाही साक्षीसाठी पाचारण होण्याची शक्यता आहे. तशी परवानगी मागणारा अर्ज मंगळवारी सरकारी पक्षातर्फे करण्यात आला असून, त्यावर न्यायालय ३१ जानेवारी रोजी निर्णय देणार आहे. सत्र न्यायालयातील खटल्यापूर्वी वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर सलमानविरुद्धचा खटला सुरू होता आणि त्यांच्यासमोरच सलमानच्या गाडीखाली चिरडून जखमी झालेल्यांची साक्ष नोंदविण्यात आली होती.
महानगर दंडाधिकाऱ्यांव्यतिरिक्त अंधेरी आरटीओचे मुख्य अधिकारी आणि सलमानच्या रक्ताचे नमुने वांद्रे पोलीस ठाण्यातून कालिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत नेणाऱ्या पोलिसाची साक्ष नोंदविण्याची परवानगीही सरकारी पक्षाने या अर्जाद्वारे केली आहे.
दरम्यान, अपघातानंतर सलमानच्या रक्ताचे नमुने घेताना आवश्यक ती प्रक्रिया अवलंबिण्यात आली नाही, असा दावा सलमानच्या वतीने उलट तपासणीदरम्यान करण्यात आला. सलमानच्या रक्ताचे नमुने घेणाऱ्या जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांची सलमानच्या वकिलांनी मंगळवारच्या सुनावणीत उलट तपासणी घेतली.