३८ वष्रे सेवेत असलेले बंडू जाधव पुढील महिन्यात निवृत्त

मशीद स्थानकानंतरच्या सिग्नलजवळील हक्काचा थांबा घेऊन गाडी सुखरूप सीएसटीच्या धक्क्याला लागली की, लोकांचा लोंढा गाडीबाहेर पडतो. अनेक जण मान वर करून स्थानकातल्या भल्या थोरल्या घडय़ाळाकडे पाहून आपल्या मनगटावरील घडय़ाळातील वेळ दुरुस्त करून घेतात आणि मार्गस्थ होतात. आता या ब्रिटिश काळातील घडय़ाळाला दर आठवड्यात न चुकता चावी देऊन घडय़ाळाची वेळ सांभाळणारे रेल्वेचे घडय़ाळजी पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत.

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात ब्रिटिश काळातील भली मोठी अशी पाच घडय़ाळे आहेत. यात इमारतीच्या बाह्य भागात दिसणाऱ्या आणि सर्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या मोठय़ा घडय़ाळाचाही समावेश आहे. या पाचही घडय़ाळांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी बंडू जाधव गेली ३८ वष्रे नेमाने पार पाडतात. या घडय़ाळांना चावी देण्यापासून त्यांचे तेलपाणी करण्यापर्यंतचे सगळे काम बंडू जाधवच करतात. १९७९ पासून रेल्वेच्या सेवेत असलेले जाधव रेल्वे कर्मचाऱ्यांमध्येही घडय़ाळजी म्हणूनच प्रसिद्ध आहेत.

बंडू जाधव यांच्या आधी हे काम गिरगावातील चांदिवाले यांच्याकडे होते. चांदिवाले सेवानिवृत्त झाल्यावर हे काम जाधव यांनी सांभाळले. ही मोठी घडय़ाळे प्रचंड आहेत. ‘लुण्ड अँड ब्लॉकली’ या कंपनीने तयार केलेली ही घडय़ाळे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसची इमारत बांधल्यापासूनच या स्थानकात आहेत. म्हणजेच यातील प्रत्येक घडय़ाळ हे किमान १५० वष्रे जुने आहे. पुली-वजन या तंत्राने चालणाऱ्या या घडय़ाळांसाठी प्रत्येकी १६५ मीटर पोलादी वायर लागते. ही वायर चावीने गुंडाळल्यानंतर उलगडत जाते. या वायरचे एक टोक १७० किलो एवढ्या प्रचंड वजनाला बांधलेले असते. ही चावी देण्यासाठी दोन माणसांची गरज असते आणि ती वायर गुंडाळण्यासाठी तब्बल ४० ते ४५ वेळा चावी फिरवावी लागते, अशी माहिती जाधव यांनी दिली. एकदा चावी दिली की, साधारण आठ दिवस हे घडय़ाळ चालते. ती तार उलगडत जाते आणि वजन खाली येते. १०-१२ वर्षांपूर्वी ही तार तुटून १७० किलोचे हे वजन थेट महाव्यवस्थापकांच्या बठकीच्या कक्षात पडल्याची आठवणही जाधव सांगतात.

स्थानकातील पाच मोठ्या घडय़ाळांशिवाय मध्य रेल्वेच्या विविध विभागांच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या कक्षातही जुनी घडय़ाळे आहेत. अशी तब्बल २२ घडय़ाळे एकट्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानक इमारतीत आहेत. या घडय़ाळांना चावी देण्याची जबाबदारीही जाधव यांच्यावरच आहे. दर दिवशी प्रत्येक घडय़ाळापाशी जाऊन त्याची तपासणी करणे, दर आठ दिवसांनी त्यांना चावी देणे, महत्त्वाच्या प्रसंगी ती घडय़ाळे घासूनपासून लख्खं ठेवणे हे काम बंडू जाधव ३८ वष्रे नेमाने करत आहेत. आता ३१ मार्चपासून ते आणि ही घडय़ाळे यांच्यात असलेल्या बंधाचे काटे थांबणार आहेत.

कोण चालवणार वारसा?

या घडय़ाळाची दुरुस्ती करण्याचे कामही जाधव करतात, पण मोठी दुरुस्ती असली, तर राजाबाई टॉवरमध्ये असलेल्या घडय़ाळाचे घडय़ाळजी व्यंकटेश्वर राव यांना बोलावले जाते, असेही त्यांनी सांगितले. सध्या जाधव यांच्यासह मध्य रेल्वेचे वरिष्ठ सेक्शन अभियंता सुभाषचंद्र िझकू आणि महेंद्रसिंग हे दोघे या घडय़ाळाची जबाबदारी घेण्यास सज्ज झाले आहेत. या दोघांना चावी देणे आणि वरवरची साफसफाई ही कामे येत असली, तरी प्रत्यक्षात देखभाल-दुरुस्ती करणारे कोणी नाही, असेही जाधव यांनी बोलून दाखवले.