आजारातून बरे करण्याचे आश्वासन देत उपचारांच्या नावाखाली बलात्कार करणाऱ्या बंगालीबाबाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सन २०१० साली जेजे मार्ग पोलिसांनी या बाबाला अटक केले होते.

नोव्हेंबर २०१० मध्ये १८ वर्षीय मुलीने आपल्यावर एका बंगालीबाबाने बलात्कार केल्याची तक्रार जेजे मार्ग पोलीस ठाण्यात दाखल केली. मे २००९ ते नोव्हेंबर २००९ या कालावधीत तक्रारदार मुलगी तिच्या १३ ते २१ वर्षे वयोगटातील एक सख्खी बहिण व चार मावस बहिणी तसेच एक २२ वर्षीय मोलकरीण यांच्यावर बलात्कार करून त्यांचा अनेकवेळा गर्भपातही घडवून आणल्याचे स्पष्ट झाले. जेजे मार्ग पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरिक्षक खंडेराव पाटील, निरिक्षक बागवे यांनी सखोल तपास केल्यावर या अत्याचारांमागची वेगळीच कहाणी उघडकीस आली. पीडित मुलींचे भाऊ जन्मापासून मंदबुध्दी असल्याने त्यांना बरे करून देतो व मुलींना भविष्यात त्यांच्या पोटी मंदबुध्दी मुले जन्माला येऊ नये यासाठी मंत्र-तंत्राचा वापर करतो असे पीडित मुलींच्या आईवडिलांना आश्वासन दिले होते.