दहशतवादविरोधी लढ्यात पोलिसांना रोज नवनव्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस दलाकडून तंत्रज्ञानाबरोबरच अन्य पर्यायांचाही वापर केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र पोलिसांकडून अधिकाऱ्यांना उर्दू, अरबी आणि बांगला भाषेचे शिक्षण देणाऱ्या कार्यशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या कार्यशाळांच्या माध्यमातून सोशल मिडीया आणि अन्य मार्गाने गुप्त माहिती गोळा करणाऱ्या निवडक अधिकाऱ्यांना उर्दू, अरबी आणि बांगला या भाषा शिकविल्या जात आहेत. आम्ही अज्ञात ठिकाणी या कार्यशाळा सुरू केल्या असून याठिकाणी अधिकाऱ्यांना निरनिराळ्या भाषेतील मजकूर वाचण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये उर्दू, अरबी आणि बांगला भाषेचा समावेश आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली. यापूर्वीही अधिकाऱ्यांना उर्दू आणि अरबी भाषा शिकविली जात होती. मात्र, जुलै महिन्यात बांगलादेशमध्ये आयसिसने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही आता अधिकाऱ्यांना बांगला भाषा शिकविण्याचाही निर्णय घेतला आहे. भारतात मोठ्याप्रमाणावर बांगलादेशी स्थलांतरित येतात. यापैकी अनेकजण समाजविरोधी कारवायांमध्ये सहभागी असतात. मात्र, त्यांचे संभाषण आम्हाला कळत नाही, असे माथूर यांनी सांगितले.

[jwplayer DLtzut14]

सूत्रांच्या माहितीनुसार, ढाका येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आयसिसने बांगलादेशमध्ये खोलवर पाळेमुळे रोवल्याचे समोर आले होते. त्यामुळे बांगलादेशी तरूणांच्या माध्यमातून भारतीय उपखंडातही आयसिसकडून हल्ले घडविण्यात येण्याची शक्यता आहे. यापूर्वी बांगलादेशकडे केवळ बनावट पैशांचे रॅकेट चालवणारे केंद्र म्हणून पाहिले जात होते. मात्र, ढाक्यातील हल्ल्यामुळे भारतातही दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी बांगलादेशचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच दहशतवादी कारवायांची माहिती गोळा करताना बांगला भाषा येणे गरजेचे बनले आहे. जानेवारी महिन्यात आयसिसचे जाळे उद्ध्वस्त करताना आम्हाला उर्दू भाषेची मदत झाली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांना ऑनलाईन घडामोडींवर लक्ष ठेवण्यात आणि आरोपींची चौकशी करताना मदत झाली. यापूर्वी आरोपींची चौकशी करताना पोलिसांना संबंधित भाषेचे प्राध्यापक किंवा न्यायालयातील कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागत असे. मात्र, आता अधिकाऱ्यांनाच भाषेचे ज्ञान असल्याने चौकशीचे काम आणखी सोपे झाले आहे. जानेवारी महिन्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दहशतवादविरोधी पथकांसह केलेल्या संयुक्त कारवाईत सहा राज्यांतून आयसिसशी संबंधित  १४ जणांना ताब्यात घेण्यात आले होते.

[jwplayer ixq7Pnde]