वाशिम जिल्ह्य़ातील होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमासाठी पुरोहितांवर तीन कोटींचा खर्च; समर्थक-विरोधकांमध्ये वाद

राज्यातील बंजारा समाजाच्या नावाने २४ मार्च ते ४ एप्रिल या दरम्यान वाशिम जिल्ह्य़ातील पोहरादेवी येथे लक्षचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या यज्ञाच्या आयोजनावरुन समाजात दोन तट पडले आहेत.

संबंध मानव कल्याणासाठी या यज्ञाचे आयोजन करण्यात आले असल्याचा मुख्य संयोजक प्रेमसिंग राठोड यांचा दावा आहे. तर, बंजारा संस्कृतीत यज्ञाचा प्रकारच नाही, असे सांगत गोर-बंजारा संस्कृती संवर्धन सभेने त्याला तीव्र विरोध केला आहे. या यज्ञावर सात कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, समाजाच्या नावाने ही उधळपट्टी असल्याचा आरोप सभेच्या मुख्य प्रवर्तक जिजा राठोड यांनी केली आहे.

बंजारा समाजाचे आदर्श असलेल्या संत सेवालाल महाराज यांची पोहरादेवी येथे अडिचशे वर्षांपूर्वीची समाधी आहे. सेवालाल महाराजांचा वारसा चालविणारे संत डॉ. रामराव महाराज यांच्याच अधिपत्याखाली लक्षचंडी विश्वशांती यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावरुन या समाजातील दोन गटात मतभेद निर्माण झाले आहेत. जिजा राठोड यांनी वाशिम जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवून हा यज्ञ रद्द करण्याची मागणी केली आहे. बंजारा समाज हा जल, धरती, वायु, सूर्य व अग्नि अशा पंचतत्त्वाची पुजा करतो. मुळातच विश्वकल्याणाचा विचार करणारा बंजारा समाज मानवतावादी, समतावादी व विज्ञानवादी आहे. कोणासही पुजू नका, कोणाचेही भजन गाऊ नका, असे सेवालाल महाराजांनी बजावून ठेवले आहे. तरीही अंधश्रद्धा, कर्मकांड आणि विषमतेविरुद्ध लढताना बलिदान केलेल्या संत सेवालाल महाराजांच्या समाधीस्थळी लक्षचंडी यज्ञाचे आयोजन करणे ही बंजारा समाजाची मानहानी असून बंजारा समाजाची आदिम संस्कृती भ्रष्ट करण्याचे हे नियोजनबद्ध षडयंत्र आहे, असा आरोप जिजा राठोड यांनी केला आहे.

या संदर्भात लक्षचंडी यज्ञाचे मुख्य संयोजक प्रेमसिंग राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, या यज्ञाचे त्यांनी जोरदार समर्थन केले. बंजारा समाजाच्या संस्कृतीत यज्ञाची परंपरा नाही, या विरोधकांच्या आक्षेपाकडे त्यांचे लक्ष वेधले असता, कोणत्या ग्रंथात तसे लिहिले आहे, हे त्यांनी सांगावे, असे आव्हान त्यांनी दिले.

विरोध करणाऱ्यांना धमकी

या यज्ञासाठी समाजातून वर्गणी जमा करुन सात कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यांतील तीन कोटी रुपये पुरोहितांवर खर्च होणार आहे. हा पैसा असा यज्ञावर खर्च करुन समाजात अंधश्रद्धा वाढविण्यापेक्षा, त्याच पैशाचा उपयोग गरीब मुलांचे शिक्षण, आरोग्य, उद्योग, यांवर खर्च केला तर, बंजारा समाजाच्या प्रगतीला हातभार लागेल, अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. यज्ञाला विरोध केल्यामुळे आपणास जिवे मारण्याच्या व बलात्कार करण्याच्या निनावी धमक्या देण्यात आल्या असून, त्या संदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती जिजा राठोड यांनी दिली.