राज्यातील ऊस उत्पादन क्षेत्रावर सुमारे पन्नास लाख लोकांचा रोजगार अवलंबून असून ऊस उत्पादक शेतकरी मोडला तर सरकार मोडेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी दिला, तर कोल्हापूरमधील शेतकरी संतप्त झाला तर तेथे फिरणेही कठीण होईल असा इशारा जयंत पाटील यांनी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिला.
प्रामुख्याने राष्ट्रवादी व काँग्रेसचीच वर्षांनुवर्षे मक्तेदारी असलेल्या सहकारी साखर कारखानदारीतील तोटय़ामुळे त्याचा फटका एकूणच ऊस उत्पादक शेतकऱ्यांपासून ऊसतोडणी कामगारांपर्यंत सर्वानाच बसत असतानाच सहकारमंत्र्यांनी साखर कारखान्यांभोवती फास आवळण्यास सुरुवात केली. या पाश्र्वभूमीवर उसाला रास्त आधारभूत किंमत देण्याची मागणी करीत ऊस उत्पादक शेतकरी जगला पाहिजे अशी जोरदार मागणी अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आमदारांनी लावून धरली. साखर कारखाने व साखर उद्योग कसा अडचणीत आला आहे याची माहिती देत केंद्र व राज्याने मदत द्यावी अशी मागणीही या आमदारांनी केली. केंद्र व राज्य शासन बडय़ा कारखान्यांचे लाल गालिचा अंथरून स्वागत करते. त्यांच्यावर सवलतींचा वर्षांव केला जातो. व्होडाफोनला ३२०० कोटींचा कर माफ केला जातो असे सांगत ऊस उत्पादक शेतकरी मोडला तर सरकार मोडेल असा इशारा अजित पवार यांनी दिला.