आपल्या अंगाच्या मापानुसार कपडे शिवून वा आयते विकत घेणे ही आजवरची रीत. हेच पादत्राणांबाबत. पायाला बसतील ते शूज विकत घ्यायचे, ही नेहमीची पद्धत. पण आता हे सारे जुनेपुराणे झाले आहे. आता कपडय़ांच्या मापानुसार शरीराला आकार देण्यात येतो. हिल्सचे शूज आपल्या मापाचे नसतात म्हणून पायाचा आकार बदलण्यात येतो.. आणि हे सगळे सर्रास सुरू आहे अगदी महानगरी मुंबईत.  
बोटॉक्स उपचार आणि सौंदर्य शस्त्रक्रियांच्या माध्यमातून ‘डिझायनर कस्टम मेड’ कपडय़ांप्रमाणे ‘अवयव बेतण्याचा’ प्रकार महानगरांतून मोठय़ा प्रमाणावर सुरू असून बडय़ा आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डचे किंवा डिझाइनरचे कपडे घालण्यासाठी तरुणी सर्रास या शस्त्रक्रियांकडे वळत आहेत.   
सुंदर दिसण्यासाठी ब्युटी पार्लर्स आणि जिमचे उंबरे झिजवण्यापासून ते डायटिंगच्या खुळापर्यंत अनेक प्रयोग केले जातात. शरीरयष्टी कमनीय व्हावी यासाठी अतिउपवास करणे, खाल्यावर लगेचच उलटी करुन अन्न बाहेर काढणे असे प्रयोगही सर्रास करण्यात येतात. पण आता यापुढे जाऊन या तरूणी बोटॉक्स ट्रिटमेंट आणि सौंदर्य शस्त्रक्रियेच्या ‘पी हळद हो गोरी’ उपायांकडे वळताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय ब्रँडचे हिल्स शूज घालता यावेत म्हणून ‘सिंड्रेला प्रोसिजर’ या गोंडस नावाखाली पावलांचा आकारही बदलला जातो, अशी माहिती सुप्रसिद्ध सौंदर्यतज्ञ डॉ. जमुना पै यांनी दिली.
मांडी, पोट, नितंब, हात-पाय यातील अतिरिक्त चरबी काढण्यासाठी ‘लिपोसक्शन’, ‘टमी टक’, ‘आर्म लिफ्ट’ शस्त्रक्रिया होतात. ओठांचा वा नाकाचा आकार बदलण्यापासून योग्य मापाची जीन्स घालण्यासाठी मांडय़ांमधील अंतर सुधारणे, गुढघ्याच्या खालचा भाग कमनीय बनवणे,  बेंबीला विशिष्ट आकार देणे, या शस्त्रक्रिया करण्यात तरुणींना वावगे वाटेनासे झाले आहे.