दिवाळी आधी मुंबईच्या रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवणार असल्याची ग्वाही मुंबई महानगरपालिकेने उच्च न्यायालयाला दिली आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत पुढच्या पावसासाठी मुंबईचे रस्ते तयार होतील असेही महापालिकेने न्यायालयात स्पष्ट केले.
पावसामुळे खड्डे भरता आले नाहीत, असे निवेदन मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी नुकतेच स्थायी समितीत दिले होते. तसेच मुंबईतील खड्ड्यांप्रकरणी पालिकेच्या अभियंत्यांना पिंजऱ्यात उभे करणे चूक असल्याचे उत्तर महानगरपालिकेकडून मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आले होते. ‘मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी पालिकेकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. मात्र या खड्ड्यांवरुन पालिकेच्या अभियंत्यांना पिंजऱ्यात उभे करणे चूक आहे,’ अशा शब्दांमध्ये ज्येष्ठ वकील अनिल साखरेंनी मुंबई उच्च न्यायालयात पालिकेची बाजू मांडली होती.
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईमधील रस्त्यांवर खड्डे पडतात आणि त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागतो. फेब्रुवारीमध्ये होऊ घातलेल्या पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर खड्डे प्रश्नावरुन काँग्रेससह सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. मुंबई दिवाळीपूर्वी खड्डेमुक्त न झाल्यास पालिका आयुक्तांनाच खड्डय़ात उभे करण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला. तर अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही पालिका अभियंत्यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.