स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलन यंत्रणेची तपासणी सुरू
वातानुकूलित लोकलच्या चाचणीसाठीची आवश्यक कागदपत्रे नेमकी कोणाकडे आहेत, हा घोळ कायम असताना आता या गाडीची कारशेडमधील चाचणी पूर्ण होण्यासाठी बेल्जियमच्या अभियंत्यांची कसोटी लागणार आहे. या गाडीचे स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलन यंत्रणा, विद्युत यंत्रणेची कसून तपासणी करण्यासाठी बेल्जियमचे अभियंते कुर्ला कारशेडमध्ये अहोरात्र मेहनत करत असून, पुढील दीड आठवडय़ात या चाचण्या पूर्ण करण्याचे लक्ष्य त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे आता या गाडीच्या चाचण्या मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवडय़ात होणार असल्याचे सांगितले जात आहे.
वातानुकूलित लोकल पूर्णपणे भारतीय बनावटीची असल्याचे सांगितले जात होते. मात्र या गाडीच्या चाचणीसाठी बेल्जियमच्या अभियंत्यांना पाचारण करण्यात आले आहे. सध्या कुर्ला कारशेडमध्ये या गाडीच्या चाचण्या होत आहेत. ही गाडी एका जागी उभी असून गाडीचे सर्वच्या सर्व स्वयंचलित दरवाजे एकत्र उघडबंद होतात की नाही, सर्व पेंटोग्राफ वर-खाली होतात की नाही, वातानुकूलन यंत्रणा सर्व डब्यांमध्ये एकसमान आहे की नाही, अशा अनेक चाचण्या हे अभियंते सध्या घेत आहेत.
ही गाडी ५४ कोटी रुपयांची आहे. त्यामुळे ती प्रवाशांच्या सेवेत येण्याआधी किंवा रुळांवर तिच्या धावत्या चाचण्या सुरू होण्याआधीच या गाडीतील सर्व यंत्रणा उत्तम चालत आहेत की नाहीत हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी बेल्जियमच्या अभियंत्यांची एक तुकडी आणि कुर्ला कारशेडमधील मध्य रेल्वेचे कर्मचारी व अभियंते एकत्रितपणे काम करत आहेत.
हे काम लवकर व्हावे, यासाठी बेल्जियमवरून आलेल्या अभियंत्यांची निवासी व्यवस्था कारशेडजवळच करण्यात आली आहे. तसेच या अभियंत्यांच्या कुटुंबीयांना भारतात यायचे असल्यास, त्याचीही व्यवस्था करण्यास रेल्वे तयार आहे. पण या चाचण्या लवकर आणि अधिक परिणामकारकपणे पूर्ण होण्याची गरज आहे, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी सांगितले.

१५ दिवसांत रुळांवर चाचणी
या चाचण्या पूर्ण होण्यास किमान दीड आठवडय़ाचा कालावधी जाणार आहे. त्या दरम्यान रेल्वे बोर्डाकडूनही आम्हाला परवानगी मिळेल. त्यानंतर मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवडय़ात गाडीच्या चाचण्या सुरू होतील. त्या चाचण्यांसाठी प्रथम श्रेणीचे तिकीट किंवा पास असलेल्या प्रवाशांना किंवा महिला व लहान मुलांना प्रवास करण्याची मुभा देण्याचा विचारही सुरू असल्याचे ब्रिगेडिअर सूद म्हणाले.