उच्च न्यायालयात ‘बेस्ट’चा दावा

‘बेस्ट’ची वातानुकूलित बससेवा बंद करण्याचे खापर ‘बेस्ट’ने आता ‘ओला’-‘उबर’ या ‘अ‍ॅप’आधारित टॅक्सी सेवा तसेच ठाणे नवी मुंबई महानगरपालिकांनी सुरू केलेल्या वातानुकूलित बससेवेवर फोडले आहे. ही सेवा बंद करण्यासाठी आर्थिक नुकसानाच्या कारणासह ‘ओला’-‘उबर’सारख्या ‘अ‍ॅप’आधारित टॅक्सी सेवाही तेवढय़ाच जबाबदार असल्याचा दावा ‘बेस्ट’ने उच्च न्यायालयात दाखल प्रतिज्ञापत्रात केला आहे.

वातानुकूलित बससेवा बंद केल्याच्या ‘बेस्ट’च्या निर्णयाला बी. बी. शेट्टी या लेखापालाने अ‍ॅड्. व्ही. पी. पाटील यांच्यामार्फत जनहित याचिका करून आव्हान दिले आहे. नुकसान होत असल्याचे कारण पुढे करून ‘बेस्ट’ ही सेवा बंद करू शकत नाही. तर ही सेवा देणे ही पालिकेची घटनात्मक जबाबदारी आहे, असा दावा करत ही सेवा सुरू करण्याचे आदेश देण्याची मागणीही याचिकाकर्त्यांने केली आहे. तसेच आर्थिक नुकसानाला जबाबदार असलेल्या ‘बेस्ट’चे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

या याचिकेवर उत्तरादाखल ‘बेस्ट’ने नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करत ही सेवा बंद करण्यासाठी नवे कारण पुढे केले आहे. सध्या बहुतांश लोक ‘ओला’-‘उबर’ यासारख्या ‘अ‍ॅप’आधारित टॅक्सी सेवांचा लाभ घेणे वा त्यांनी प्रवास करणे पसंत करतात. शिवाय ठाणे आणि नवी मुंबई पालिकांनी वातानुकूलित बससेवा सुरू असल्यामुळे आधीच आर्थिक नुकसानामुळे अडचणीत आलेल्या या सेवेला खासगी टॅक्सी सेवांचाही फटका बसल्याचे ‘बेस्ट’ने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्याचबरोबर ही सेवा बंद होण्यासाठी ‘बेस्ट’चे व्यवस्थापक वा कुठलाही कर्मचारी जबाबदार असल्याचे आरोपाचे खंडन करताना आर्थिक नुकसान हेच त्यामागील मुख्य कारण ‘बेस्ट’ने दिले आहे. शिवाय ‘बेस्ट’ आर्थिक अडचणीत नसल्याची ‘विकिपीडिया’ने प्रसिद्ध केलेली माहितीही विश्वसनीय नसल्याचा दावाही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा दाखला देत ‘बेस्ट’ने केला आहे.

यापूर्वीच्या प्रतिज्ञापत्रात मतभिन्नता 

वातानुकूलित बस सेवेमुळे ‘बेस्ट’ला मोठय़ा प्रमाणात तोटा सहन करावा लागत होता. ‘बेस्ट’ तोटय़ात असण्याच्या काही प्रमुख कारणांपैकी हेही एक कारण होते. त्यामुळे सगळ्या परिस्थितीचा विचार करूनच ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, असा दावा ‘बेस्ट’ने केला होता. एवढेच नव्हे, तर ही सेवा पुन्हा सुरू करण्याची आपली इच्छा आहे, असा दावाही ‘बेस्ट’ने केला होता. ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी छोटय़ा आकाराच्या वातानुकूलित बस खरेदी करण्याचा विचार आहे, असे सांगताना सद्य:स्थितीला मुंबई ते ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर अशी नियमित बससेवाही सुरू असल्याचे ‘बेस्ट’ने प्रतिज्ञापत्रात म्हटले होते.