१ मेपासून सहा मार्गावरील वातानुकूलित बससेवा रद्द; तोटा टाळण्यासाठी उपक्रमाचा निर्णय
प्रवाशांचा अल्पप्रतिसाद आणि खर्चाच्या पुनप्र्राप्तीचे प्रमाण अतिशय कमी असल्याने बेस्टच्या तोटय़ात आणखी भर पडू नये, यासाठी येत्या १ मेपासून सहा मार्गावरील वातानुकूलित सेवा, तर ५१ मार्गावरील साध्या बस गाडय़ांना पूर्णविराम देण्याचा निर्णय ‘बेस्ट’ प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यामुळे उपनगर आणि दक्षिण मुंबई मार्गाना जोडणाऱ्या काही सेवांना प्रवाशांना मुकावे लागणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
बेस्टच्या वातानुकूलित बस गाडय़ांच्या बंद होणाऱ्या सहा मार्गामध्ये ए-७४- गोरेगाव ते वरळी, ए-७५- हिरानंदानी गार्डन, पवई ते वरळी, ए-७६- गोराई डेपो ते वरळी, ए-७७- गोराई डेपो ते वांद्रे-कुर्ला संकुल, एस-९- घाटकोपर ते वस्तुसंग्रहालय आणि एस-५९२ वरळी ते कोपरखैराणे या मार्गाचा समावेश आहे. मात्र या मार्गावर गेली अनेक वर्षे प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून हे मार्ग बंद करण्याबाबत विरोध दर्शवला जात आहे.
मात्र तोटय़ातील मार्गावर बस सेवा सुरू ठेवणे म्हणजे ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जर बस सेवा चालवण्यासाठी शंभर रुपये खर्च होत असेल आणि त्यातून केवळ ३० रुपये परत मिळत आहेत. अशा परिस्थितीत सहा वातानुकूलित आणि ५१ साध्या बस गाडय़ा तोटय़ाच्या मार्गावर सुरू ठेवणे हे दिवसेंदिवस कठीत होत चालले आहे. यात बेस्टच्या तोटय़ात प्रचंड वाढ होत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाची इच्छा नसतानाही या मार्गावरील सेवा बंद करावी लागत असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान या मार्गावरील सेवा बंद होऊ नये, यासाठी प्रवासी प्रतिनिधित्व म्हणून किमान ४५ प्रवाशांनी या बस गाडय़ांचे मासिक पास काढावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्यामुळे बेस्ट प्रशासनाला या सेवा सुरू ठेवता येतील, असे सांगण्यात आले.

‘बेस्ट’ची गाडी नव्या रंगरूपात!
बेस्ट बस म्हटले, की लाल डबा त्यावर पिवळा किंवा सफेद रंगात ओढलेला पट्टा नजरेसमोर तरळतो. मात्र येत्या काळात हे चित्र बदणार आहे. आर्थिक तोटय़ात धावणाऱ्या बेस्टला गती देण्यासाठी बस गाडय़ांचा रंग बदण्यात येणार आहे. यासाठी ‘जे.जे स्कूल’च्या कला विभागातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. बस गाडीचा रंग, चालक-वाहक यांचा पोशाख आणि बोधचिन्ह यात बदल केले जाणार आहेत. मात्र हे नवे बदल करण्याबाबत बेस्ट समितीच्या बठकीत निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.