‘बेस्ट’चे भाडे यापुढे डिझेलच्या दराशी निगडित करण्याचा प्रस्ताव लवकरच सादर करण्यात येणार आहे. तसे झाल्यास दरवाढ मंजूर करण्याचे अधिकार परस्पर बेस्ट समितीला देण्यात येणार असून त्यानंतर बेस्टच्या दरवाढीचे प्रस्ताव स्थायी समिती अथवा पालिका सभागृहात आणावेच लागणार नाहीत.
‘बेस्ट’चा २०१३-१४ चा ६३१७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला. बेस्टला आर्थिक तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी विविध सूचना केल्या. अर्थसंकल्पात बेस्टने पहिल्या दोन टप्प्यांमध्ये एक रुपया भाडेवाढ सुचविली आहे. स्थायी समितीने त्यासही मंजुरी दिली असून ही भाडेवाढ १ एप्रिलपासून लागू होणार आहे.
बेस्टची भाडेवाढ डिझेलच्या दराशी निगडित करावी, अशी मागणी शैलेश फणसे यांनी केली. टायर, चेसी आणि डिझेलच्या दरवाढीनुसार एसटीची भाडेवाढ केली जाते. तशीच पद्धत अहमदाबादमध्येही अवलंबण्यात येते. त्यांचा विचार बेस्टनेही करावा, अशी सूचना दिलीप पटेल यांनी केली. बेस्टला महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या ‘परिवहन निधी’त वाढ करण्याची आवश्यकता आहे. डिझेल आणि सीएनजीवरील जकातीवर ५ टक्के अधिभार आकारून त्याचा ‘परिवहन निधी’ म्हणून वापर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
डिझेलच्या दराशी निगडित बसभाडे निश्चित करण्याबाबतचा बेस्टचा विचार असून या संदर्भात परिपूर्ण अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी सांगितले.