मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टच्या मार्गिकेवरून बुधवारी खासगी स्कूल बस धावताना दिसत होत्या. या बस बेस्टच्या मार्गिकेनुसार जात असल्यामुळे अनेकांनी याचा फायदा घेतला.
‘स्कूल बस ओनर्स असोशिएशन’ (सोबा)ने सुमारे ५२० बस शाळेच्या वेळा वगळून नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. याला वाहतूक विभागानेही मान्यता दिली होती. या सर्व बसेस त्यांच्या मर्यादित विभागात फिरत असल्यामुळे माणशी १० रूपये दर आकारला जात होता. या सुविधांचा फायदा अनेक चाकरमानी आणि विद्यार्थ्यांना झाला. या बस शाळा भरल्यानंतर ती सुटेपर्यंतच्या मधले काही तास उपलब्ध असतात. ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘सोबा’ने स्वत:हून वाहतूक विभागाशी संपर्क साधल्याची माहिती असोशिएशचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली. या बस सेवा स्थानकांपासून विविध परिसरातील मुख्य ठिकाणापर्यंत पुरविण्यात आल्या होत्या. ही सेवा पुरवित असताना विद्यार्थ्यांच्या शाळेच्या ने-आण करण्याच्या सेवेवर कोणताही परीणाम झाला नसल्याची माहितीही त्यांनी दिली. बसच्या या फेऱ्यांमधून झालेले उत्पन्न मालकांनी न घेता ते चालक आणि क्लिनरला विभागून देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. याचबरोबर काही रेल्वे स्थानकांच्याबाहेर स्कूल बस व्यतिरिक्त इतर खाजगी कंत्राटदारांच्या बसेसही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यातील काही मोफत सेवा देता होत्या तर काही दुप्पट दरानेही सेवा देता होत्या.