मुंबईकरांना दिवाळी भेट!

मुंबई मेट्रोच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे घटत चाललेली ‘बेस्ट’ बसची प्रवासीसंख्या वाढवण्यासाठी परिवहन उपक्रमाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. अधिकाधिक प्रवाशांना बेस्टकडे आकृष्ट करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने आता बेस्टचे तिकीट मोबाइलवर मिळवून देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. सुरुवातीला फक्त वातानुकूलित बसगाडय़ा आणि मासिक-त्रमासिक पास नूतनीकरणासाठी लागू असलेली ही मोबाइल तिकीटप्रणाली गुरुवारपासून सुरू होत आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला मुंबईकरांसाठी ही ‘बेस्ट भेट’ ठरणार असल्याचे बेस्ट प्रशासनाचे म्हणणे आहे.

बेस्टच्या प्रवाशांसाठी मोबाइल तिकीट सेवा सुरू करण्याचा मानस बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी गेल्या महिन्यात व्यक्त केला होता. ही सेवा दिवाळीपर्यंत सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. तसेच काही आठवडय़ांपूर्वी बेस्ट समितीसमोर या अ‍ॅपचे सादरीकरणही करण्यात आले होते. आता हे अ‍ॅप गुरुवारपासून प्रत्यक्षात प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. त्यासाठी बेस्टने मुलुंडसह आणखी एका आगारात महिनाभर या अ‍ॅपची चाचणी घेतली आहे. या योजनेला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर ती सर्व बसना लागू होणार आहे.

तिकीट कसे काढणार?

* बेस्टचे तिकीट काढण्यासाठी ट्रायमॅक्स कंपनीने ‘रिडलर’ (ridlr) हे अ‍ॅप तयार केले आहे.

* हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध असून ते मोबाइलमध्ये डाउनलोड करावे लागेल.

* मोबाइलमध्ये हे अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर सर्वप्रथम प्रवाशांना त्यांचा मोबाइल क्रमांक त्या अ‍ॅपवर नोंदवावा लागणार आहे.

* मोबाइल क्रमांक नोंदवल्यानंतर प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी बसमध्ये चढणे आवश्यक आहे.

* बसमध्ये चढल्यानंतर कोणत्या थांब्यापासून कोणत्या थांब्यापर्यंत प्रवास करायचा आहे त्याची माहिती अ‍ॅपमध्ये टाकणे आवश्यक आहे.

*  त्यानंतर या अ‍ॅपद्वारे प्रवाशांना टोकन मिळेल. टोकन मिळाल्यावर प्रवासी वाहकाला हे टोकन दाखवून त्याच्याकडून छापील तिकीट घेऊ शकतात.

* तसेच डिजिटल वॉलेटद्वारे मोबाइलवरच तिकीट प्राप्त होऊ शकते. हे तिकीट वाहकाकडे असलेल्या यंत्राद्वारे स्कॅन होऊ शकते.

या अ‍ॅपचे सादरीकरण समिती सदस्यांपुढे झाले होते. तसेच ट्रायमॅक्स कंपनीशी पाच वर्षांपूर्वी झालेल्या करारात अशा प्रकारच्या अ‍ॅपची तरतूद होती. त्यामुळे या अ‍ॅपसाठी समिती सदस्यांची मान्यता मिळवण्याची गरज नव्हती. तरीही प्रवाशांसाठी ही सेवा सुरू करताना बेस्ट प्रशासनाने समिती सदस्यांना कल्पना देण्याची गरज होती. तसे न झाल्याने सदस्यांमध्ये नाराजी आहे.

– अ‍ॅड. संदेश कोंडविलकर, बेस्ट समिती सदस्य, काँग्रेस</strong>

आधुनिकतेच्या दृष्टीने हे मोठे पाऊल बेस्टने उचलले आहे. सध्या ही सेवा वातानुकूलित गाडय़ांपर्यंतच मर्यादित आहे. मात्र पुढे जाऊन ही सेवा सर्वच गाडय़ांना लागू होईल. त्याशिवाय यंदाच्या अर्थसंकल्पात या आधुनिकीकरणासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याला मान्यता मिळाल्यास येत्या काळात ही सर्व तिकीट यंत्रणा बेस्टच्या कार्यालयाशी जोडली जाणार आहे.

– डॉ. जगदीश पाटील, महाव्यवस्थापक (बेस्ट उपक्रम)