गळक्या बस गाडय़ांची चाचणी, इतर सर्व मार्गाचीही तपासणी
दरवर्षी पावसाळी परीक्षेत नापास होणाऱ्या बेस्टकडून यंदाच्या मान्सूनपूर्व जोरदार तयारी केली जात आहे. यात शहरात धावणाऱ्या सर्व बेस्ट बस गाडय़ांची तपासणी केली जाणार आहे. यात बेस्ट बस गाडय़ात गळती शोधण्यात येणार आहेत. याशिवाय पावसाळ्यात प्रवाशांच्या अंगावर पाणी उडू नये, यासाठी टायरजवळ रबरी झडप बसवण्यात येणार आहेत.
सध्या मुंबई व उपनगरात बेस्टच्या २७ डेपोतून चार हजार १०१ बस गाडय़ा चालवल्या जातात. यातून सुमारे २८ ते २९ लाख प्रवासी रोज प्रवास करतात. यात दरवर्षी पावळ्यात बेस्ट बस गाडय़ांना गळती लागत असते. याच धर्तीवर यंदाच्या पावसाळ्यात बेस्टने आपल्या प्रवाशांवर जलाभिषेक करण्याचा संकल्प सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
बेस्टच्या सर्व बस गाडय़ांच्या चाचणीचे आदेश बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी दिले आहेत. यात बस गाडीच्या काचा पुसून काढण्याचे साधन तपासले जाणार आहेत. तसेच बेस्ट गाडीतील गळती शोधण्यात येणार आहेत.
याशिवाय पावसाळ्यापूर्वी सर्व मार्गाची तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. तर काही बसच्या खिडक्या काही केल्या बंद होत नसल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे पोहोचल्या होत्या. त्यामुळे बेस्टकडून ही समस्या सोडवण्याचे काम केले जात आहे.

गळती नेमकी कशामुळे?
बेस्ट बसेसची बांधणी भक्कम असून त्या सांगाडय़ातून कधीच गळती होत नाही. मात्र तयार झालेल्या बस गाडीत टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी वायिरग केले जाते. हे वायिरग करताना बसच्या मूळ सांगाडय़ाला धक्का पोहोचतो आणि तो सांगाडा काही प्रमाणात खिळखिळा होतो. अनेकदा ही गळती त्याच्यामुळे होते. बऱ्याचदा झाडाच्या मोठय़ा फांदीचा फटका लागूनही बसच्या सांगाडय़ाला धक्का पोहोचतो आणि गळती होते, असे सांगण्यात आले.