‘बेस्ट’ उपक्रमातील चालक आणि वाहक यांच्यासाठी लागू करण्यात आलेले ‘कॅनेडियन वेळापत्रक’रद्द करण्यात यावे. वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला नाही तर १ ऑगस्ट रोजी ‘बेस्ट’चे चालक आणि वाहक आंदोलन पुकारतील, असा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनतर्फे शुक्रवारी देण्यात आला.
१ एप्रिल २०१४ पूर्वी ‘बेस्ट’मध्ये वाहक आणि चालकांसाठी पारंपरिक पद्धत होती. प्रशासनाकडून एका कॅनेडीयन कंपनीस कंत्राट देण्यात येऊन सॉफ्टवेअरच्या आधारे वाहक व चालकांच्या कामाचे वेळापत्रक तयार करण्यात आले. याला कर्मचारी संघटनांनी विरोध केला होता. वाहक आणि चालकांना हे नवे वेळापत्रक त्रासदायक ठरणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.
शुक्रवारी सकाळपासून पुन्हा कॅनेडियन वेळापत्रकाप्रमाणे कामाचे तास लावण्यात आल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकला. या वेळापत्रकाची सक्ती करण्यात आली तर कोणत्याही क्षणी वाहक व चालक काम बंद करतील असा इशारा संघटनेचे अ‍ॅड. उदयकुमार आंबोणकर यांनी दिला आहे.
दरम्यान या वेळापत्रकाबाबत संघटनेबरोबर करार झाला आहे. कर्मचारी संघटनेबरोबर चर्चा करूनच त्याला मंजुरी देण्यात आली होती. तरीही वाहक व चालकांनी आंदोलन पुकारले तर कारवाई केली जाईल, असा इशारा बेस्ट प्रशासनाने दिला आहे.