पाच दिवसांचा आठवडा करावा या मागणीसाठी बेस्टच्या वीज उपक्रमातील ब श्रेणीतील ८०० अभियंते ३० जुलै (शनिवार) रोजी एक दिवसाचे सामुहिक रजा आंदोलन करणार आहेत. रजेवर जाणाऱ्या अभियंत्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शुक्रवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत करण्यात आली.

गेल्या आठवडय़ातही या अभियंत्यांनी सामुहिक रजेचे शस्त्र परजले होते. त्याची माहिती बेस्ट समिती सदस्यांना दिली गेली नसल्याने तसेच आंदोलनामुळे दुरुस्तीचे काम न झाल्याने त्याचे पडसाद बेस्ट समितीच्या बैठकीत उमटले. रवी राजा (कॉंग्रेस)यांनी  प्रशासनाचा निषेध म्हणून सभा तहकुबीचा प्रस्ताव आणला होता. सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा देत प्रशासनावर टिका केली. दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या या मागणीवर वेळीच तोडगा काढणे आवश्यक असल्याचे या सदस्यांनी सांगितले. या बाबत विविध विभागप्रमुखांच्या समितीने अहवाल सादर केला आहे. चर्चेने तोडगा काढण्याऐवजी सामुहिक रजेवर जाणे हे चुकीचे आहे. या प्रकरणी शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले.