वाहतूक विभागाचा तोटा भरून काढण्यासाठी आणि अतिरिक्त तिकीटवाढ रोखण्यासाठी पुढील आर्थिक वर्षांत १५० कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या बेस्टची जबाबदारी पालिकेने झटकली आहे. मेट्रो रेल्वेमुळे बेस्टचा प्रवासी वाहतुकीमधला तोटा वाढला असल्याने बेस्ट प्रशासनाने एमएमआरडीएकडेच मदत मागावी, असा सल्ला स्थायी समिती अध्यक्षांनी बुधवारी समितीच्या बैठकीत दिला. पालिकेने मदत केली नाही तर बेस्टच्या तिकीटभाडय़ात फेब्रुवारीपासून किमान रुपया व त्यानंतर एप्रिलपासून अतिरिक्त दोन रुपयांची वाढ प्रस्तावित आहे.
बेस्टचा २०१४-१५ या वर्षांचा अर्थसंकल्प स्थायी समितीत चर्चेला आला आहे. स्थायी समितीने यावर अहवाल, सूचना तसेच अभिप्राय पालिकेकडे सादर करणे अपेक्षित असते. अर्थसंकल्पावरील प्रास्ताविक भाषणात स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी बेस्ट प्रवासी वाहतुकीतील तोटय़ासाठी मेट्रोला जबाबदार धरले. मेट्रो सुरू झालेल्या मार्गावरील बेस्टच्या प्रवासी संख्येत घट झाली असून तोटा वाढला आहे. त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी एमएमआरडीएकडूनच दीडशे कोटी रुपये मागावेत, असा सल्ला त्यांनी दिला. बेस्टचे प्रवासी खेचलेल्या मेट्रो रेल्वे आणि मोनो रेल बेस्टनेच चालवण्यासाठी घ्याव्यात. यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा. तसेच बेस्टच्या आगारात खाजगी वाहनांसाठी वाहनतळाची सोय करण्याची सूचना त्यांनी केली.
बेस्टच्या परिवहन विभागाचा तोटा भरून काढण्यासाठी विद्युत पुरवठा विभागातील उत्पन्नाचा उपयोग केला जातो. मात्र गेली काही वर्षे ही तूट वाढली आहे. त्यामुळे गेल्यावर्षी महापालिकेने इतिहासात पहिल्यांदाच बेस्टला दीडशे कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यातील केवळ ३२ कोटी ५० लाख रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित पैसे तातडीने मिळाले नाहीत तर तिकीटवाढ अटळ आहे.
त्याचप्रमाणे पुढील वर्षांसाठीही बेस्टकडून दीडशे कोटी रुपयांची मदत मागण्यात आली असून ती नाकारली गेल्यास एक एप्रिलपासून किमान भाडय़ात अतिरिक्त दोन रुपयांची वाढ होईल. याचाच अर्थ किमान भाडे सहावरून नऊ रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. बेस्टला मदत करण्याबाबत स्थायी समितीला निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. त्यानंतर महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात अर्थसंकल्पाला मान्यता दिली जाईल.

सल्ले असे आहेत..
*कचऱ्यापासून वीजनिर्मिती करावी
*रस्त्यांवरील दिव्यांसाठी सौर उर्जा वापरावी.
*कॅनडियन शेडय़ुल रद्द करून पुर्वीची कार्यपद्धती आणावी.
*वेगाने र्निबध घालावेत.
*दुमजली बस रविवार व सुट्टय़ांदिवशी चालवाव्या.