एप्रिल महिन्यापासून मुंबईकर आणि आसपासच्या महानगर प्रदेशातील प्रवाशांच्या खिशावर जबरदस्त ताण पडणार आहे. बेस्टच्या तिकिटांची दरवाढ, रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात थेट दुप्पट वाढ आणि रेल्वेच्या तात्काळ कोटय़ातील तिकिटांपैकी ५० टक्के तिकिटांची चढय़ा दराने विक्री, या सर्व गोष्टी १ एप्रिलपासून लागू होणार असल्याने मुंबई महापालिका व केंद्र सरकार यांनी मुंबईकरांना पुरेपूर ‘फूल’ बनवण्याची सोय केली आहे.
बेस्टने या तिकीट दरवाढीचा निर्णय खूप आधीच, म्हणजे नोव्हेंबरमध्येच घेतला होता. या नव्या दरवाढीनुसार तिकिटांत एक ते दोन रुपयांची घसघशीत दरवाढ होणार आहे.
रेल्वेची तात्काळ कोटय़ातील ५० टक्के तिकिटे डायनॅमिक सूत्रानुसार विकली जाणार आहेत. म्हणजे तात्काळ कोटय़ात २०० तिकिटे असतील, तर १०० तिकिटांच्या विक्रीनंतर पुढील १०० तिकिटे चढय़ा दराने विकली जातील. या १०० पैकी १० तिकिटे विकली गेल्यावर पुढील ९ तिकिटांसाठीचे दर २० टक्क्यांनी जास्त होतील. अशा प्रकारे ही तिकिटे दर १० टक्के आसनांच्या विक्रीनंतर २० टक्क्यांनी महाग होत जाणार आहेत.

प्लॅटफॉर्म तिकीट पाचवरून दहा रुपये
सध्या पाच रुपयांत मिळणाऱ्या प्लॅटफॉर्म तिकिटासाठी १ एप्रिलपासून दहा रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच एखाद्या यात्रेच्या, उत्सवाच्या काळात हे दर वाढवण्याचे अधिकारही रेल्वेकडे असतील.