तोटय़ातील मार्ग ४० टक्क्यांनी वाढले; दिंडोशी आगार प्रवासी संख्या सर्वाधिक
आर्थिक प्रगतीच्या नावाने बोंब असणाऱ्या बेस्टच्या तोटय़ाच्या मार्गात आणखी ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अवघ्या पाच महिन्यांत हे प्रमाण २८३ वरून ४०१ वर पोहोचले आहे. हा टक्का अशाच प्रकारे वाढत गेल्यास येत्या काळात बेस्टच्या उत्पन्नात कोटय़वधी रुपयांनी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार बेस्टच्या तोटय़ाच्या मार्गात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. जुल ते नोव्हेंबर २०१५ या काळात तोटय़ाच्या मार्गात तब्बल ४० टक्क्यांनी वाढ झालेली आहे. यात उपनगरातील सुमारे ७० टक्के मार्गाचा समावेश आहे. गेल्या सहा ते सात वर्षांपूर्वीपर्यंत बेस्टची प्रवासी संख्या ४३ लाख होती. सध्या हीच संख्या ३० लाखांवर पोहोचली आहे. त्यात बेस्टच्या तोटय़ाच्या मार्गात होणारी वाढ पाहता येणाऱ्या काळात बेस्टची स्थिती आणखी वाईट होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षभरात बेस्टची सलग दोनदा झालेली भाडेवाढ, बेस्टच्या तुलनेत शेअर टॅक्सी चालकांकडून आकारण्यात येणारे कमी भाडे, बेस्ट बसगाडय़ांची दुरवस्था आणि अॅपवर आधारित बसगाडय़ांची वाढती वाहतूक याचा एकत्रित परिणाम पाहता बेस्टच्या तोटय़ाच्या मार्गात वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.
तर चालक आणि वाहक यांच्या अनुपस्थितीचा फटका बेस्टला बसत असल्याचे सांगितले जात आहे. नियमानुसार शहरात धावणाऱ्या बेस्ट बसगाडीला सुमारे २०० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. मात्र तोटय़ात धावणाऱ्या मार्गावर बेस्टचे चालक आणि वाहक पुष्कळदा अनुपस्थित राहत असल्याने हे प्रमाण वाढल्याचे सांगितले जात आहे.

दिंडोशी आगार ‘बेस्ट’
उपनगरातील विविध मार्गावर धावणाऱ्या बेस्ट बसगाडय़ांकडे प्रवासी पाठ फिरवत असले तरी दिंडोशी आगारातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. दिंडोशी आगारातून रोज एक लाख ४७ हजार प्रवासी प्रवास करत असल्याचे समोर येत आहे. तर मालाड आगारातून रोज ६६ हजार ५२३ प्रवासी प्रवास करत असल्याचे सांगितले जात आहे.