बेस्टच्या विद्युत सेवेबद्दल तक्रार असणाऱ्या ग्राहकांना आतापर्यंत ती तक्रार नोंदवण्यासाठी होणारा त्रास बेस्ट उपक्रमाने कमी करण्याचे ठरवले आहे. वीजपुरवठय़ातील बिघाडांबाबत तक्रार नोंदवण्यासाठी बेस्टने नियंत्रण केंद्र उभारले आहे. मात्र आतापर्यंत या केंद्रात तक्रार नोंदवताना वीज बिल क्रमांक, ग्राहक क्रमांक आणि बिलाची पूर्ण माहिती देण्याची गरज होती. ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी बेस्टने आता तक्रार करताना केवळ ग्राहकाने आपले नाव, इमारतीचे नाव आणि रस्त्याचे नाव, याच गोष्टी सांगायच्या आहेत. त्यामुळे आता वीज गेल्यावर तक्रार नोंदवताना वीज बिलातील तपशील देण्याची गरज उरलेली नाही.
बेस्टच्या विद्युत पुरवठय़ात खंड झाल्यास किंवा काही बिघाड झाल्यास पूर्वी थेट बेस्टच्या कार्यालयात येऊन तक्रार करण्याची गरज होती. मात्र बेस्टने आपला नियंत्रण कक्ष सुरू केल्यावर ग्राहकांना केवळ दूरध्वनीवर तक्रार नोंदवणे शक्य झाले आहे. पण वीजपुरवठय़ात बिघाड झाला किंवा काही कारणांनी हा पुरवठा खंडित झाला, तर ग्राहकांना तक्रार नोंदवताना या वीज बिलावरील तपशील नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना सांगणे आवश्यक असते. त्या तपशिलावरून कर्मचारी तक्रार नोंदवून तिचे निवारण करतात.
अनेकदा रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर ग्राहकांना वीज बिल शोधण्यापासून ते वाचण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी त्रास सहन करावा लागत होता. तक्रार नियंत्रण व निवारण कक्षात दूरध्वनीवरून संपर्क साधल्यावर ग्राहक क्रमांक, वीज बिल क्रमांक आदी तपशिलांशिवाय तक्रारही घेतली जात नव्हती. अशा परिस्थितीत बेस्टच्या विद्युत ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. १८-१९ जून रोजी बेस्टच्या तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर या तक्रारींचा ओघ वाढला होता. मात्र त्या वेळीही अनेक तक्रारदारांना बेस्टकडून हीच उत्तरे मिळाल्याने त्यांचा संताप झाला होता. तक्रार नोंदवताना अत्यावश्यक असलेल्या या बाबींबद्दल ग्राहकांनी बेस्ट उपक्रमाकडे नाराजीही व्यक्त केली होती.त्यावर तोडगा म्हणून आता बेस्ट उपक्रमाने ही तक्रार नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता तक्रार करण्यासाठी वीज बिलातील तपशिलाची आवश्यकता राहणार नाही. आता फक्त ग्राहकाने त्याचे नाव, त्याच्या इमारतीचे नाव आणि जवळचा रस्ता अथवा गल्ली यांचा तपशील देणे आवश्यक आहे. हा तपशील देण्यात ग्राहकांना काहीच अडचण नसल्याने तक्रार लवकर नोंदवून तिचे निवारणही तातडीने केले जाईल, असे बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी स्पष्ट केले. बेस्टकडे असलेल्या नव्या सॉफ्टवेअरच्या मदतीने संबंधित भागातील विद्युत पुरवठा कुठे खंडित झाला आहे, त्याचे तपशील बेस्टला तातडीने मिळतील, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले. बेस्टच्या या निर्णयामुळे तब्बल १० लाख ग्राहकांना दिलासा मिळणार असून वीजपुरवठा खंडित झाल्यावर अंधारात वीज बिल शोधण्याच्या आणि त्यावरील तपशील वाचण्याच्या त्रासातून त्यांची मुक्तता झाली आहे.