राज्य सरकारच्या ‘तेजस्विनी’ योजनेतून ५० गाडय़ा चालवण्याचा प्रस्ताव

मुंबईतील नोकरदारांसाठी उपनगरीय लोकलएवढय़ाच जवळच्या बेस्टने आता ५० महिला विशेष गाडय़ा विकत घेण्याचा प्रस्ताव राज्य सरकारसमोर ठेवला आहे. या गाडय़ा राज्य सरकारच्याच ‘तेजस्विनी योजने’तून घेण्याचा बेस्ट उपक्रमाचा प्रस्ताव आहे. या योजनेद्वारे बस खरेदी करण्याची ५० टक्के रक्कम बेस्ट आणि ५० टक्के रक्कम राज्य सरकार देणार आहे. मात्र राज्य सरकारने अद्याप या योजनेला मंजुरी दिलेली नाही. या बसगाडय़ा ताफ्यात आल्यास बेस्टला आणखी अनेक मार्गावर महिला विशेष गाडय़ा चालवता येतील.

बेस्ट उपक्रमातर्फे महिलांसाठी गर्दीच्या वेळी महिला विशेष गाडय़ा चालवल्या जातात. गर्दीच्या वेळी महिलांना प्रवास करणे सुलभ जावे, यासाठी या बसगाडय़ा सोडल्या जातात. मात्र एकूण महिला प्रवाशांच्या तुलनेत सध्याच्या गाडय़ांची संख्या कमी असल्याने ‘बेस्ट’ने आणखी काही मार्गावर ‘महिला विशेष’ गाडय़ा चालवण्याचे निश्चित केले आहे. यासाठी बेस्ट प्रशासनाने राज्य सरकारच्या ‘तेजस्विनी योजने’अंतर्गत ५० नव्या कोऱ्या बसगाडय़ा खरेदी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. या योजनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेचा वाहतूक विभाग आणि राज्य सरकार प्रत्येकी ५० टक्के रक्कम देऊन बसगाडय़ा विकत घेणार आहे. या बसगाडय़ा फक्त महिलांसाठीच चालवल्या जाणार असून त्यांची बांधणी आणि अंतर्गत सजावटही  महिलांसाठी सुलभ आणि उपयुक्त होईल, अशा पद्धतीने केली जाणार आहे. बेस्टने राज्य सरकारकडे ५० बसगाडय़ा विकत घेण्याचा प्रस्ताव पाठवला असला तरी राज्य सरकारने अद्याप या प्रस्तावाबाबत निर्णय घेतलेला नाही, असे बेस्ट उपक्रमाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोफणे यांनी सांगितले. बेस्टच्या महिला प्रवाशांसाठी या ५० गाडय़ांव्यतिरिक्त बेस्ट उपक्रमाकडून गर्दीच्या वेळी ७२ विशेष फेऱ्या चालवल्या जातात. त्याचप्रमाणे ६० फेऱ्यांमध्ये पहिल्या थांब्यावर महिलांना चढण्यासाठी प्राधान्य दिले जाते. महिला प्रवाशांना बेस्ट उपक्रम आपला वाटावा आणि त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी ही संख्या पुढील काळात वाढवण्याचा बेस्ट उपक्रमाचा विचार आहे, असेही गोफणे यांनी स्पष्ट केले.