शहरात मान्सून काळात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी बेस्ट उपक्रमासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने विशेष योजना तयार केली आहे. यात पावसाळ्यात शहरात पाणी साठल्यास किंवा रेल्वे सेवा बंद पडल्यास बेस्ट उपक्रमाकडून काय उपाययोजना करण्यात येतील, याचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, याकरता जादा बस गाडय़ा, सूचना आणि हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिले जाणार आहे.
सध्या शहराच्या सार्वजनिक वाहतुकीत रेल्वेपाठोपाठ बेस्ट सेवा महत्त्वाची मानली जाते. बेस्टमधून रोज सुमारे २९ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे येत्या पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी बेस्टकडून जादा बस गाडय़ा चालवल्या जाणार आहेत. त्याचसोबत बेस्टच्या हेल्पलाइन क्रमांकांची तपासणीही करण्यात आली असून आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी बेस्ट सज्ज झाले आहे.