अलीकडच्या काळात सौरऊर्जेच्या वापरामुळे होणारी विजेची बचत पाहता आता मुंबईकर वीज ग्राहकांना घरावर किंवा इमारतींवर सौरऊर्जेची निर्मिती करून तिचा वापर करण्याची मुभा ‘बेस्ट’ प्रशासनाकडून देण्यात येणार आहे. ‘महाराष्ट्र राज्य वीज आयोगा’च्या निर्देशानुसार एक मेगावॅटपेक्षा कमी वीज वापर असलेल्या वीज ग्राहकांना घराच्या छतावर ‘सौरऊर्जेचे पॅनल’ बसवणे शक्य झाले आहे. बेस्टच्या वीज ग्राहकांनी सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करावा यासाठी बेस्ट प्रशासनाने हा पुढाकार घेतला आहे.
शहरातील बेस्ट वीज ग्राहाकांनी सौरऊर्जेचा वापर केल्यास ग्राहकांचे मासिक वीज बिल कमी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांना आपल्या घराच्या छतावर सौरऊर्जेद्वारे निर्मिती होणाऱ्या विजेचा वापर करायचा आहे अशा ग्राहकांनी नोंदणी करण्याचे आवाहन बेस्टने केले आहे. यासाठीचे नोंदणी अर्ज बेस्टच्या ग्राहक सेवा केंद्रात, त्याचप्रमाणे http://www.bestundertaking.com उपलब्ध केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.सौरऊर्जेद्वारे निर्माण झालेल्या वीज युनिटसंबधित वीज ग्राहकाच्या खात्यात जमा होणार आहे. त्यानंतर मासिक वीज बिल तयार करताना, वीज ग्राहकाने वापरलेल्या एकूण वीज युनिटातून सौरऊर्जेतून तयार झालेल्या वीज युनिट वजा करून ग्राहकांना बिल देण्यात येणार आहे. मात्र, ज्या ग्राहकांनी वापरापेक्षा अधिक सौरऊर्जा युनिट्सची निर्मिती केली असेल अशा ग्राहकांची सौरऊर्जा युनिट पुढील महिन्यासाठी साठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सौरऊर्जा नोंदणी शुल्क
पाच किलो वॅटपर्यंत वीज वापर असणाऱ्या ग्राहकाला नोंदणीसाठी ५०० रुपये तर ५ किलोवॅटपेक्षा अधिक वापर असणाऱ्यांना १००० रुपये नोंदणी शुल्क भरावे लागणार असल्याचे सांगण्यात आले.