मुंबईकर प्रवाशांच्या जिवाशी दर दिवशीचा खेळ करणाऱ्या फोर्ट फेरी बसगाडय़ा लवकरच भंगारात काढण्याचा निर्णय अखेर बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. या खराब झालेल्या बसगाडय़ांऐवजी बेस्ट ३३ नव्या लो फ्लोअर बसगाडय़ा विकत घेणार असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
काही वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेस्टने आपल्या ताफ्यात लो फ्लोअर बसगाडय़ा घेतल्या होत्या. मात्र सुरुवातीपासूनच या गाडय़ांच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या गाडय़ा चालताना मध्येच बंद पडल्याच्या आणि त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याशिवाय कधी डुगडुगत, तर कधी गचके देत चालणाऱ्या या गाडय़ा प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही तकलादू असल्याचे मत अनेक प्रवाशांनी वारंवार व्यक्त केले होते. या गाडय़ांचे पत्रे निघण्याचे प्रकारही निदर्शनास आले होते.
त्यामुळे या गाडय़ा भंगारात काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार लो फ्लोअर गाडय़ा आपल्या ताफ्यात ठेवण्यासाठी बेस्टने ३३ नव्या गाडय़ा घेण्याचे ठरवले आहे. या नव्या गाडय़ांची निविदा प्रक्रिया बेस्टने सुरू केली असून निविदा उघडल्याची माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी दिली. आता या निविदा भरल्यानंतर प्रस्ताव बेस्ट समितीसमोर सादर होणार आहे. बेस्ट समितीच्या मान्यतेनंतर या गाडय़ा उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होती. त्यामुळे या गाडय़ा पुढील आर्थिक वर्षांपर्यंत बेस्टच्या ताफ्यात येण्याची शक्यता आहे.
या गाडय़ा १२ मीटर लांबीच्या असून अल्ट्रा लो फ्लोअर प्रकारातील असतील. गाडय़ांमधील आसनव्यवस्था कशी असावी, दरवाजे कसे असावेत, याबाबत बेस्टने काही निर्णय घेतले आहेत. तसेच या गाडय़ांची किंमत ४५ लाखांच्या आसपास असून या गाडय़ांना न्युमॅटिक प्रणालीचे दरवाजे असतील. त्यामुळे गाडीतून उतरण्यासाठी प्रवाशांनी दाराजवळील बटण दाबल्यानंतर हे दार उघडणार आहे, असेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.