बेस्टच्या परिवहन विभागाचा तोटा वीज ग्राहकांकडून परिवहन विभाग तूट अधिभारा(टीडीएलआर)च्या माध्यमातून वसूल करण्यात येतो. गेल्या तीन वर्षांत बेस्टच्या वीज ग्राहकांकडून तब्बल २३६२ कोटी रुपयांचा अधिभार वसूल करण्यात आला आहे. मात्र येत्या काळात हाच भार दुप्पट करण्याचा विचार असल्याने पुढील तीन वर्षांत बेस्ट वीज ग्राहकांवर सुमारे चार हजार कोटींचा अधिभार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेस्टच्या वीज ग्राहकांत नाराजी पसरल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्य वीज नियामक आयोगाने मंजुरी दिल्यानंतर बेस्टने वीज ग्राहकांकडून १ जून २०१२ पासून टीडीएलआर वसूल करण्यास सुरुवात झाली. वीज आयोगाकडून बेस्टसाठी मंजूर केलेल्या बहुवार्षकि वीज दरात दरवर्षी वाढ करण्यात आली. यात गेल्या तीन वर्षांत वीज ग्राहकांकडून २ हजारांहून अधिक टीडीएलआर वसूल करण्यात आला आहे. त्यातच बेस्टला उत्पन्नासाठी इतर स्रोत मिळेपर्यंत टीडीएलआर वसूल करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवीन वीज दराबाबत बेस्टने राज्य वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावातही टीडीएलआर कायम ठेवण्यात आला आहे. सध्या वीज देयकाच्या १५ टक्के इतका टीडीएलआर आकारण्यात येतो. हाच भार ३० टक्के करण्याचा प्रस्ताव बेस्टने वीज आयोगाकडे दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे येत्या काळात मुंबईतील वीज ग्राहकांवर सध्याच्या तुलनेत दुप्पट अधिभार आकारला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

वर्ष टीडीएलआर (रक्कम कोटी रुपयांत)
’ २०१२ ३५९.३ कोटी रु.
’ २०१३ ६३९.९३ कोटी रु.
’ २०१४ ६८१.६२ कोटी रु.
’ २०१५ ६८१.४८ कोटी रु.
’ एकूण २३६२.३३ कोटी रु.
(ही आकडेवारी जून २०१२ ते नोव्हेंबर २०१५ पर्यंत आहे.)