कर्मचाऱ्यांना पगारातील ५०० रुपयांची रक्कम ‘चिल्लर’ स्वरूपात

आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्ट प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे पगार विलंबाने देताना पगारातील काही रक्कम १० रुपयाच्या नाण्यांद्वारे कर्मचाऱ्यांच्या हाती रोख सोपवल्याने त्यांच्यात संतापाची भावना व्यक्त होत आहे. पगाराची रक्कम बँकेत जमा होण्यास उशीर झाल्याने कर्मचारी आधीच वैतागले होते. त्यात ही १० रुपयाची ५० नाणी त्यांच्या हातात टेकवण्यात आल्याने ते संतप्त झाले आहेत.

बेस्टच्या कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यापासून वेतन वेळेत मिळालेले नाही. फेब्रुवारी महिन्याचे वेतन २२ मार्चनंतर कर्मचाऱ्यांना मिळाले. मार्च महिन्याच्या वेतनाबाबतही हीच परिस्थिती ओढावली. या आठवडय़ात बेस्टच्या परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बँकेतील खात्यात पगाराच्या रकमेपेक्षा ५०० रुपये कमी जमा करण्यात आले. बेस्टच्या २६ आगारांमधील परिवहन विभागाच्या ३० हजार कर्मचाऱ्यांना ही रक्कम १० रुपयाच्या ५० नाण्यांच्या स्वरूपात दोन दिवसांपासून देण्यात आली.

परिवहन विभागाच्या अनेक कर्मचाऱ्यांनी या नाणीवाटपाबद्दल संताप व्यक्त केला. आतापर्यंत पगाराची सर्व रक्कम बँकेत जमा होत होती. या महिन्यात बँकेत ५०० रुपये कमी जमा करून प्रशासनाने ही रक्कम नाण्यांच्या स्वरूपात कर्मचाऱ्यांच्या हाती सोपवली. काही विशिष्ट धार्मिकप्रसंगी गोरगरिबांना खैरात वाटली जाते, तसाच हा प्रकार असून ही कर्मचाऱ्यांची मानहानी असल्याची प्रतिक्रिया कुलाबा आगारात काम करणाऱ्या विनोद खंडागळे या वाहकाने व्यक्त केली.

या नाण्यांचे करायचे काय?

बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांना विचारले असता बेस्टकडे तब्बल १.३० कोटी रुपये १० रुपयांच्या नाण्यांच्या रूपात असल्याचे त्यांनी सांगितले. आयसीआयसीआय यांसारख्या नेहमीच्या बँका ही नाणी स्वीकारायला तयार नाहीत. रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर त्यांनीही ही नाणी स्वीकारण्यास नकार दिला. नियमाप्रमाणे एवढी रोख रक्कम बेस्टच्या तिजोरीत ठेवता येत नसल्याने अखेर ३० हजार कर्मचाऱ्यांच्या खात्यात ५०० रुपये कमी जमा करत त्यांना ती रक्कम रोखीने देण्यात आल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. या आधीही अशी समस्या उद्भवली असता त्या वेळी प्रवाशांना सुटे पैसे घेऊन जाण्याचे आवाहन केल्याचेही त्यांनी सांगितले.