उद्धव ठाकरे यांची ग्वाही; विदर्भवाद्यांवरही जोरदार टीका
‘बेस्ट’ उपक्रमाने मुंबईमधील ५२ बसमार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मुंबईकरांचे हित लक्षात घेऊन हे ५२ बसमार्ग शिवसेना कोणत्याही परिस्थितीत बंद करू देणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सांगितले.
तोटय़ात चालणारे ५२ बसमार्ग बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला असून त्यावरून शुक्रवारी बेस्ट समितीच्या बैठकीत आणि पालिका सभागृहात गोंधळ उडाला होता.
सर्वपक्षीय नगरसेवकांनी ‘बेस्ट’ उपक्रमाच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला होता.
या पाश्र्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘बेस्ट’ बस ही मुंबईकरांची जीवनवाहिनी असून ५२ बसमार्ग बंद करू देणार नाही.
काही मूठभर लोकांना वेगळा विदर्भ हवा आहे. त्यांची इच्छा आम्ही कधीही पूर्ण होऊ देणार नाही. हे मूठभर लोक आईच्या पाठीवर नव्हे, तर कुशीवर वार करीत आहेत. महाराष्ट्रातील एक इंच भूमीही वेगळी होऊ देणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने महाराष्ट्र दिन मोठय़ा धुमधडाक्यात साजरा करावा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
मुंबईसह महाराष्ट्र शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेत येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत केले जाईल. संघटना वाढविण्याचे काम मी हाती घेतले आहे, असेही ते म्हणाले.

* तिसऱ्या आघाडीची वेळ येईल तेव्हा पाहू, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांनी तिसऱ्या आघाडीबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलण्यास नकार दिला.
* पालिकेतील रस्ते घोटाळ्याबद्दल बोलणे हे विरोधकांचे कामच आहे. त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, असे सांगत त्यांनी या विषयाला बगल दिली.

बस प्रवाशांमध्ये नाराजी
मुंबई : रोजच्या खर्चाचे गणित सोडवताना प्रवाशांकडून साथ मिळत नसल्याचे कारण पुढे करत बेस्ट प्रशासनाने तब्बल ५२ बसमार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यात नियमित प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची गरसोय होणार असल्याने प्रशासनाविरोधात प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. बंद करण्यात आलेल्या मार्गात सर्वाधिक म्हणजे ४१ मार्ग हे उपनगरातील असल्याने उपनगरवासीय प्रचंड संतापले आहेत.
ऐन महाराष्ट्रदिनी बेस्टकडून रद्द करण्यात आलेल्या या मार्गात दादर आणि वरळी भागातील अनेक मार्गाचा समावेश आहे.
तर बंद करण्यात आलेल्या मार्गामध्ये बहुतांश विभाग हे शिवसेनेच्या नगरसेवकांचे असल्याने यात राजकारण केले जात असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांकडून करण्यात आला आहे. यावर मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनीही बेस्ट प्रशासनाला पत्र लिहून हा निर्णय त्वरित मागे घ्यावा आणि हे बस मार्ग पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी केली आहे. मात्र, प्रशासनाकडे हे पत्र पोहोचले नसल्याचे सांगितले जात आहे.
बेस्ट प्रशासनाकडून या निर्णयाची अमलंबाजवणी करण्यासाठी तांत्रिक बाबी महिन्याभरापूर्वीच पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय रद्द करणे तांत्रिकदृष्टय़ा अशक्य असल्याचे सांगितले जात आहे.