आर्थिक डोलारा डळमळीत झाल्यामुळे महसुलात वाढ करण्याबाबत उपाययोजना सुचवीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका सभागृहात गुरुवारी बेस्ट उपक्रमाच्या २०१६-१७ या आर्थिक वर्षांतील अर्थसंकल्पास मंजुरी दिली. आगामी वर्षांत कोणत्याही प्रकारची बस भाडेवाढ सुचित करण्यात आलेली नाही. पुढील वर्षी मुंबईकरांवर भाडेवाढीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता नसल्याने मुंबईकरांना दिलासा मिळेल. पालिका सभागृहात मंगळवारपासून बेस्ट उपक्रमाच्या २०१६-१७ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. गुरुवारी या चर्चेला पूर्णविराम मिळाला आणि अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. तब्बल २८ तास ९ मिनिटे बेस्टच्या आगामी अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेत २८ नगरसेवक सहभागी झाले होते. गेली काही वर्षे तोटय़ात चालणाऱ्या बेस्टच्या परिवहन विभागास आगामी वर्षांत ६५५ कोटी रुपयांची तूट सहन करावी लागणार आहे. मात्र विद्युतपुरवठा विभागाला होणाऱ्या नफ्यामुळे ही तूट भरून निघणार आहे. आगामी वर्षांत बेस्टच्या परिवहन विभागाला २,०५१ कोटी रुपये उत्पन्न मिळेल आणि २,७०७ कोटी रुपये खर्च येईल, असा अंदाज अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला आहे.