घरांचे स्वप्न बाळगून म्हाडामध्ये अर्ज करणाऱ्यांनो, सावध राहा. हुबेहूब म्हाडाच्या संकेतस्थळाप्रमाणे दिसणारे संकेतस्थळ सक्रिय झाले असल्याची बाब उघड झाली आहे. म्हाडाने याविरोधात सायबर सेल पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सर्वसामान्य लोकांची वैयक्तिक माहिती आणि पैसे वळते करून घेण्याचा धोका या बनावट संकेतस्थळामार्फत केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज भरावेत, असे आवाहन म्हाडा आणि सायबर सेल पोलिसांनी केले आहे.
 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)ने २०१५ या वर्षांत शहरात १०६३ घरांसाठी जाहिरात दिली आहे. म्हाडाच्या संकेतस्थळावर त्यासाठी ऑनलाइन नोंदणी, अर्ज भरणे, पैसे भरणे केले जात आहेत. मंगळवारपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. मात्र हुबेहूब म्हाडाच्या संकेतस्थळासारखे दिसणारे एक संकेतस्थळ सक्रिय झाले आहे. या संकेतस्थळावर सर्व अ‍ॅप्लिकेशन्स, प्रक्रिया अगदी म्हाडाप्रमाणे आहे. विशेष म्हणजे बनावट साइटवर अप्लाय ऑनलाइन केल्यावर mhadalottery2015.in  नावाने म्हाडाचे अनधिकृत संकेतस्थळ उघडले आहे. याशिवाय सदनिकांचा तपशील, नकाशा आदी सारे त्यात दिले आहे. त्यामुळे हे म्हाडाचेच संकेतस्थळ असल्याचा समज होतो. जे कुणी या संकेतस्थळावर आपली वैयक्तिक माहिती भरत असतील ती सारी माहिती या बनावट संकेतस्थळावर जमा होत आहे. याबाबत बोलताना बीकेसी सायबर सेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील घोसाळकर यांनी सांगितले की, ज्याने कुणी हे संकेतस्थळ बनवले आहे त्याचे लोकांची सगळी वैयक्तिक माहिती गोळा करायची किंवा ही माहिती एखाद्या खासगी गृहप्रकल्पांना पुरविण्याचा हेतू असू शकतो. अशा प्रकारे म्हाडा आणि लोकांची फसवणूक करण्याचा हा प्रयत्न आहे. या बनावट संकेतस्थळाचे सव्‍‌र्हर अमेरिकेत आहे. त्याबाबत आम्ही कारवाई करत आहोत असे  घोसाळकर यांनी सांगितले. आमची माहिती तंत्रज्ञान टीम पहिल्या दिवसापासून या बनावट संकेतस्थळावर लक्ष ठेवून होती. आम्ही ती डिअ‍ॅक्टिव्हेट केल्याचा दावा म्हाडाच्या प्रवक्त्या वैशाली संदानसिंग यांनी केला आहे. लोकांनी गुगलवरून म्हाडाच्या संकेतस्थळावर न शोधता ’lottery.mhada.gov.in  या संकेतस्थळावर जाऊन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन म्हाडाने केले आहे.