मुंबई भेटीवर आलेले शहीद भगतसिंग यांचे नातू अभितेज सिंग यांनी बदलापूरजवळील सावरे गावात हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचे सहकारी स्वातंत्र्यसैनिक राघो शंकर गाडे यांची जेव्हा भेट घेतली, तेव्हा वयाची शंभरी गाठलेल्या या वृद्धाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरारले.
ठाणे जिल्ह्य़ात स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारक भाई कोतवाल आणि सहकाऱ्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. बदलापूर, मुरबाड, नेरळ, माथेरान परिसर हे त्यांचे कार्यक्षेत्र होते. पुढे फितुरीमुळे मुरबाड तालुक्यातील सिद्धगडावर भाई कोतवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जीव गमवावा लागला. मात्र त्यांच्या बलिदानाची ठळक नोंद इतिहासाने घेतली. राघो शंकर गाडे हे त्या इतिहासाचे केवळ एक साक्षीदारच नव्हे, तर त्यातील एक सदस्य आहेत. अंबरनाथ तालुक्यातील बदलापूरजवळील सावरे गावात ते राहतात. अभितेज सिंग यांना हे समजल्यावर त्यांनी थेट त्यांचे घर गाठले.