पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी मुंबईतून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे घुमान संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. घुमान साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी पुण्यातून संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर अशोक कामत यांनीही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याचे जाहीर केले असताना कथाकार भारत सासणे यांनी मुंबई मराठी साहित्य संघाकडे अर्ज दाखल केला. ज्येष्ठ कवी शंकर वैद्य हे सूचक आहेत. तर मोनिक गजेंद्रगडकर, अशोक कोठावळे, प्रदीप कर्णिक, चंद्रकांत भोंजाळ आदींनी अनुमोदक म्हणून त्यांच्या अर्जावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची लढत तिरंगी होण्याची चिन्हे आहेत.