बजाज फाऊंडेशनला देखभालीसाठी दिलेले भायखळा येथील भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालच ताब्यात घेण्यासाठी पालिका सभागृहात आटापिटा करीत नगरसेवकांनी केलेला ठराव बारगळला. त्यामुळे भविष्यातही भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालय बजाज फाऊंडेशनच्याच ताब्यात राहण्याची चिन्हे आहेत. मात्र कार्यक्रमाच्या आयोजनास पालिकेची परवानगी घेण्याचे बंधन फाऊंडेशनवर घालण्यात आले आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाजवळील भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहाच्या बाजूला पालिकेचे खेळाचे मैदान असून वाहने उभी करण्यासाठी या मैदानाचा वापर करण्याचा बजाज फाऊंडेशनने परवानगी मागितली होती. प्रशासनाने त्यास मंजुरीही दिली होती. गेली अनेक वर्षे फाऊंडेशनने वस्तूसंग्रहालयाचे आणि देण्यात आलेल्या निधीचा हिशेब दिलेला नाही. भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयाबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीची बैठकच झालेली नसल्याची बाब उजेडात आली होती. महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत वस्तूसंग्रहालयाचा आर्थिक ताळेबंद पालिकेमार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला.  येथील सभागृहात कार्यक्रम करावयाचा असल्यास त्या पालिकेची परवानगी घेणे फांऊंडेशनला बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच वाहने उभी करण्यासाठी मैदानाचा वापर करू देण्यास पालिकेने नकार दिला आहे. दर तीन महिन्यांमधून बैठक घेऊन कारभाराची माहिती द्यावी अशी सूचना फाऊंडेशनला करण्यात आली आहे.