सात निरीक्षकांच्या मूल्यांकनानंतर अंतिम टप्प्यात निवड

सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेन्ट ट्रस्टतर्फे दक्षिण मुंबईमध्ये राबविण्यात येत असलेला भेंडीबाजार पुनर्विकास प्रकल्प केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी प्रकल्प -२०१६’ पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.

भारतातील शहरी भागांचे पुनर्निर्माण करणे आणि देशभरात १०० ‘स्मार्ट सिटी’ उभारणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. नवी दिल्लीमध्ये ११ ते १३ मे या कालावधीत ‘स्मार्ट सिटी इंडिया २०१६’ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये ‘स्मार्ट सिटी प्रकल्प-२०१६’ पुरस्कारासाठी २२ प्रकल्पांचा विचार करण्यात आला. सात निरीक्षकांनी केलेल्या मूल्यांकनानंतर अंतिम टप्प्यात गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (जीआयएफटी सिटी), गुरगावमधील डीएलएफ-५, पुण्यातील ब्ल्यू रिड्ज आणि भेंडीबाजार पुनर्विकास प्रकल्प या चार प्रकल्पांची निवड केली. या चौघांतून अखेर भेंडीबाजार पुनर्विकास प्रकल्पाची ‘स्मार्ट सिटी प्रकल्प-२०१६’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. केंद्र सरकारच्या शहर विकास मंत्रालयाचे माजी सचिव डॉ. सुधीर कृष्णा यांच्या हस्ते हा पुरस्कार सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेन्ट ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आला.

भेंडीबाजारमधील १६.५ एकर जागेवरील मोडकळीस आलेल्या २५० इमारतींच्या जागी भेंडीबाजार पुनर्विकास प्रकल्प उभारण्यात येत आहे. या इमारतींमध्ये ३,२०० कुटुंबे आणि १,२५० दुकानांचा समावेश आहे. या प्रकल्पात १७ इमारती उभारण्यात येणार असून अरुंद रस्त्यांमुळे या परिसराचे रूपडे बदलून जाणार आहे.