भारतरत्न भीमसेन जोशी यांची सुमारे १० कोटी रुपयांची मालमत्ता आणि जवळपास २० संगीत कंपन्यांच्या रॉयल्टीवरून त्यांच्या पहिल्या व दुसऱ्या पत्नींच्या मुलांमध्ये सुरू असलेला वाद उच्च न्यायालयात पोहोचला असून त्यावरील सुनावणी ११ ऑगस्ट रोजी होणार आहे.
जोशी यांचा पुणे येथील ‘कलाश्री’ बंगला आणि दोन फ्लॅट तिसऱ्या पक्षाला विकण्याला पुणे दिवाणी न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निर्णयाला जोशी यांच्या दुसऱ्या पत्नी वत्सला यांच्या तीन मुलांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. वास्तविक जोशी यांच्या मृत्युनंतर लगेचच त्यांची पहिली पत्नी सुनंदा यांचा मुलगा राघवेंद्र यांनी जोशी यांच्या मृत्युपत्राला दिवाणी न्यायालयात आव्हान दिले होते. तसेच मालमत्ता विकण्यास प्रतिबंध करण्याची मागणी केली होती. ती मागणी मान्य करीत पुणे दिवाणी न्यायालयाने जोशी यांचा बंगला आणि दोन फ्लॅट अशी मालमत्ता विकण्यास मज्जाव केला होता. जोशी यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता. त्यामुळे हिंदू विवाह कायद्यानुसार त्यांच्या मालमत्तेत आपल्यालाही समान अधिकार असल्याचा दावा राघवेंद्र यांनी तेव्हा केला होता. मृत्युपत्र तयार करतेवेळी जोशी यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती, असा दावा करीत राघवेंद्र यांनी त्यांच्या मृत्युपत्राला आव्हान दिले आहे.
जोशी यांनी बंगला, दोन फ्लॅट आणि संगीत कंपन्यांची रॉयल्टी वत्सला यांच्या मुलांना दिली होती, तर २० लाख रुपये पहिल्या पत्नीच्या मुलांच्या नावे बँकेत जमा केले होते. भीमसेन दुसरी पत्नी वत्सला व मुलांसोबत ‘कलाश्री’मध्ये राहत होते. त्यामुळे हा बंगला वत्सला यांच्या मालकीचा असल्याचा दावा त्यांच्या मुलांकडून केला जात असल्याचेही राघवेंद्र यांनी कनिष्ठ न्यायालयातील दाव्यात म्हटले आहे. वत्सला यांचे २००५ मध्ये निधन झाल्यावर जोशी यांनी ‘कलाश्री’ बंगल्यातील काही समभाग मुलगी शुभदा आणि मुलगा जयंत यांच्या पत्नीला बक्षीस म्हणून दिले होते. शिवाय दोन फ्लॅट्समधील समभाग दुसऱ्या पत्नीचा मुलगा श्रीनिवास यांच्या नावे केले, असेही राघवेंद्र यांनी दाव्यात म्हटले आहे.