भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या भुमिपूजनासाठी अखेर राज्य सरकारला मुहूर्त मिळाला आहे. बाबासाहेबांच्या जयंती दिनी म्हणजे येत्या १४ एप्रिल रोजी या स्मारकाचे भुमिपूजन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ५८व्या महापरिवनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी आले असता मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक मुंबईत आधीच्या इंदू मिलच्या मालकीच्या जागेत चैत्यभूमीजवळ उभारण्याच्या निर्णयास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. हे स्मारक उभारण्याची विनंती राज्य सरकारने केली होती. मुंबईतील चैत्यभूमीजवळ हे स्मारक उभारण्यात येणार असून ही जागा पूर्वीच्या इंदू मिलच्या मालकीची आहे. या ठिकाणी डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येईल व राज्य सरकारशी त्याबाबत चर्चा चालू आहे. त्यातील कायदेशीर बाबी लवकर पूर्ण केल्या जातील असे वस्त्रोद्योग मंत्रालयाने शुक्रवारी म्हटले होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतच राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर आदी नेते यावेळी उपस्थित होते. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, रिपाइं नेते रामदास आठवले आणि मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांनी देखील डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर हजेरी लावली होती.