देवेंद्र फडणवीस सरकारचा विस्तार करण्यात येणार असल्यास आपल्या पक्षाला मंत्रिपद मिळाले पाहिजे, असा आग्रह रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे आणि राजू शेट्टी या घटक पक्षांच्या नेत्यांनी धरला आहे.
आपल्याला राज्यात परतण्याची इच्छा नाही. पण आमच्या पक्षाच्या नेत्याला मंत्रिपद दिले जावे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे नेचे रामदास आठवले यांनी व्यक्त केले. भाजप नेत्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानुसार आपला केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला जावा, अशी अपेक्षा खासदार आठवले यांनी व्यक्त केली. मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश केला जावा, अशी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांची इच्छा आहे. स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते सदाशिव खोत यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जावा, अशी खासदार राजू शेट्टी यांची भूमिका आहे. मेटेसुद्धा गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत.
भाजपपुढे वेगळीच समस्या आहे. मंत्रिमंडळात समावेश करावा तर या सर्वांना विधान परिषदेवर निवडून आणण्याची कसरत भाजपला करावी लागणार आहे. विधान परिषदेच्या चार जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. चारही जागांवर मित्र पक्षाच्या नेत्यांना निवडून आणण्यासाठी भाजपला सारे नियोजन करावे लागेल. यामुळेच दोघांचा मंत्रिमंडळात समावेश तर अन्य दोघांची महामंडळाच्या अध्यक्षपदी बोळवण करण्याची तयारी असल्याचे समजते.