विधानसभा निवडणुकांनंतर महानगरपालिकेत बदललेल्या सत्तासमीकरणांनी बुधवारी झालेल्या पालिकेच्या महासभेत आणखी एक वळण घेतले. पोलिसांच्या अपयशाचे खापर राज्य सरकारवर फोडून मनसेने भाजपला लक्ष्य केले. यात काँग्रेसने मनसेची बाजू घेतली तर दरम्यानच्या काळात भाजपच्या मदतीशिवाय एकाकी पडलेल्या सत्ताधारी शिवसेनेने शांतपणे बघ्याची भूमिका घेत भाजप एकाकी पडत असल्याच्या नाटय़ाचा आस्वाद घेतला.
 हे सारे घडत असताना ‘नवऱ्याच्या जीवावर निवडून आलेल्यांनी आपल्याला नगरसेवकपद सांभाळण्याचे धडे देऊ नयेत’ असे विधान मनसेचे संदीप देशपांडे यांनी एक नगरसेविकेला उद्देशून केल्याने त्यावर वादंग झाला.
महापालिकेचे सभागृह सुरू झाले तेच विरोधी पक्षनेता देवेंद्र आंबेरकर यांच्या आरोग्यक्षेत्रावरील निवेदनाने. यावर्षी डेंग्यूची साथ रोखण्यात पालिकेला आलेले अपयश आणि शीव रुग्णालयात पीडित बालिकेवरील उपचारांमध्ये हयगय होत असल्याबद्दल त्यांनी टीका केली. राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी त्यास पािठबा दिला. शीव रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बालिकेवर बलात्कार करणारा आरोपी महिनाभरानंतरही पोलिसांना पकडता न आल्याचे खापर मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर फोडले.
विधानाने वादंग
जनतेने पूर्ण सहमती दिलेली नसल्याने भाजपाला राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागली आहे, असे देशपांडे यांनी सांगताच ‘आधी स्वतचे नगरसेवक पद सांभाळा,’ असा सल्ला भाजप नगरसेविका ज्योती अळवणी यांनी दिला. त्यावर ‘नवऱ्याच्या जीवावर नगरसेवकपद मिळवणाऱ्या महिलांनी मला नगरसेवकपद सांभाळण्याचे धडे देऊ नये,’ असे उत्तर देशपांडे यांनी दिले. त्यावर भाजपाच्या सर्वच महिला नगरसेविका त्यांच्या दिशेने धावल्या आणि देशपांडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
केली. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक देशपांडे यांच्या संरक्षणार्थ धावले. देशपांडे यांनी राष्ट्रवादीवर वार करत भाजपावर हल्ला चढवल्याने नेमकी काय भूमिका घ्यावी याबाबत राष्ट्रवादी नगरसेवक संभ्रमात होते. तर सत्ताधारी सेना नगरसेवक आपापल्या जागेवरून उठण्याची तसदी न घेता हे सारे नाटय़ तटस्थपणे पाहत होते.
सभागृहाचे कामकाज हाताबाहेर जात असल्याचे दिसल्यावर महापौर स्नेहल आंबेकर यांनी देशपांडे यांना माफी मागण्यास सांगितली. ‘पालिकेत पन्नास टक्के नगरसेविका आहेत. नगरसेविकांचा अवमान करू नका,’ असे महापौरांनी सांगूनही देशपांडे माघार घेण्यास तयार नव्हते.
अखेर पालिका सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब करून महापौर दालनात गटनेत्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर संदीप देशपांडे यांनी ‘आय एम सॉरी’ म्हणत माफी मागितली आणि वातावरण शांत झाल्यासारखे वाटले. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावरून भाजपावर टीका
केली.
सेनेच्या नगरसेविकेचे पद रद्द
जातप्रमाणपत्र पडताळणीत शिवसेनेच्या धारावीतील नगरसेविका अनुषा कोडमयांचे नगरसेवकपद रद्द झाले. बुधवारी पालिकेच्या सभागृहात याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. पालिकेतील सर्वात कमी वयाच्या नगरसेविका म्हणून ओळख असलेल्या कोडम यांच्याविरोधात याच प्रभागातून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसच्या गंगा माने यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने गंगा माने यांच्या बाजूने निकाल देत जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल दिला. महानगरपालिकेच्या २०१२ मधील निवडणुकीत विजयी झालेल्या २१ वर्षांच्या अनुष कोडम या पालिकेतील सर्वात कमी वयाच्या नगरसेविका होत्या. कोडम यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. जात पडताळणीत कोडम यांचे प्रमाणपत्र अवैध असल्याचे आढळल्याचा निकाल न्यायालयाने दिला होता. मनसेकडून विधानसभा लढल्यामुळे शुभा राऊळ यांचेही नगरसेवक पद रद्द झाल्याने सेनेचे संख्याबळ दोनने कमी झाले आहे. यापूर्वी जात प्रमाणपत्र अवैध आढळल्याने मनसेच्या विक्रोळी येथील नगरसेविका प्रियांका शृंगारे यांचे नगरसेवक पद मार्च २०१४ मध्ये रद्द करण्यात आले होते.