लोकसभा-विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष निवडीच्या चर्चेला रंग भरू लागले असले तरी विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचीच या पदावर फेरनिवड होईल अशी राजकीय परिस्थिती पक्षात उद्भविल्याचे दिसत आहे. या पदासाठी इच्छुकांच्या नावांना पसंती नाही व पसंत व्यक्ती पदासाठी इच्छुक नाहीत, असे चित्र असल्याने, सुधीर मुनगंटीवर यांचे प्रदेशाध्यक्षपद कायम राहील, असे संकेत मिळत आहेत.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या निवासस्थानी मंगळवारी झालेल्या पक्षाच्या प्रदेश सुकाणू समितीच्या बैठकीत याच मुद्दय़ावरील चर्चेची पहिली फेरी पार पडली. तावडे यांच्यासह गोपीनाथ मुंडे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे सदस्य चंद्रकांतदादा पाटील आदी नेते या बैठकीस उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्षपदासाठी एकनाथ खडसे व नागपूरचे आमदार देवेन्द्र फडणवीस यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. भाजपचे राष्ट्रीय नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष उपनेते गोपीनाथ मुंडे यांचेही नाव चर्चेत होते. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा कुणाच्या खांद्यावर येते, याविषयी पक्षात अनेक तर्कवितर्क सुरू होते. आजच्या बैठकीत यावर चर्चा झाली, परंतु कोणत्याच नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाले नाही. संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेचा जिल्हावार आढावा घेऊन आजची बैठक संपविण्यात आली.
प्रदेशाध्यक्षपदासाठी एकनाथ खडसे यांची निवड करून विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्याच्या पर्यायावरही गेले काही महिने पक्षात जोरदार खल सुरू आहे. परंतु खडसे यांनी ही जबाबदारी पेलण्यास असमर्थता दर्शविल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.
मुंडे मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर
दुष्काळी मेळाव्याचे निमित्त करून भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी मंगळवारी लातूर जिल्हय़ातील मुरूड येथे लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले. यावेळी बोलताना पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला एक व मराठवाडय़ाला दुसरा न्याय हे पक्षपाती धोरण कशासाठी? असा थेट सवाल करून मुंडे यांनी ‘अन्याय झाला तर मुंगीही चवताळून उठते, तेव्हा मराठवाडय़ातील माणसे गप्प बसतील असे कोणत्या आधारावर तुम्ही गृहीत धरले आहे’, अशी तोफ डागली.