• मराठा मोर्चा व्यंगचित्रावरून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे राजकारण
  • सेनेचा एक खासदार, दोन आमदारांचे राजीनामे?

आपल्या विविध मागण्यांसाठी मराठा समाजातर्फे काढण्यात येत असलेल्या मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील राजकीय संघर्षांला मंगळवारी अचानक धार आली. शिवसेनेच्या मुखपत्रात मराठा मोर्चासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्रावरून मराठा समाजात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्यानंतर मित्रपक्ष भारतीय जनता पक्षासह, काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी शिवसेनेविरोधात जणू मोर्चाच काढल्याचे चित्र दिसू लागले. हे बाहेरचे हल्ले सहन करणाऱ्या शिवसेनेतील एक खासदार व दोन आमदार यांनी संतापभावनेतून आपल्या पदाचे राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविले, अशी जोरदार चर्चा आहे. शिवसेनेतील आणखीही काही लोकप्रतिनिधी राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

सोमवारी बुलढाणा येथे निघालेल्या मराठा मोर्चास प्रचंड प्रतिसाद लाभला. मंगळवारी सांगलीत आयोजित मोर्चालाही उदंड प्रतिसाद होता. या मोर्चामध्ये, तसेच मराठा समाजातही शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात रविवारी प्रसिद्ध झालेल्या एका व्यंगचित्राविरोधात तीव्र नाराजी व संताप व्यक्त होत होता. हे व्यंगचित्र मराठा समाजाच्या मूक मोर्चाची खिल्ली उडविणारे असल्याचा आक्षेप घेतला गेला. सामनाच्या नवी मुंबई व ठाण्यातील कार्यालयांवर दगडफेकीचे प्रकार घडले. राजकीय आघाडीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या निमित्ताने शिवसेनेवर शरसंधान साधलेच, शिवाय भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनीही बोचऱ्या भाषेत सेनेवर टीका केली. हे सारे सुरू असताना सेनेला पक्षातूनच धक्के बसले.

व्यंगचित्रामुळे मराठा समाजात निर्माण झालेला प्रक्षोभ पाहून शिवसेनेचे बुलढाणा येथील खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमूलकर व आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी आपल्या पदांचे राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मंगळवारी सादर केले. रायमूलकर हे मेहकरचे, तर डॉ. खेडेकर हे सिंदखेडराजा येथील आमदार आहेत. हे तिघेही नेते मंगळवारी मुंबईत होते आणि त्यांनी शिवसेना मंत्र्यांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राजीनामे सादर केले. प्रतापराव जाधव यांचे चिरंजीव ऋषी जाधव यांनी समाज माध्यमावरून याबाबत माहिती जाहीर केली.

आणखी नेत्यांचे राजीनामे

बुलढाण्यातील नगरसेवक हेमंत खेडेकर यांनीही पदाचा राजीनामा सादर केला. डॉ.अजिंक्य पाटील व नितीन शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी बुलढाण्यातील मोर्चाचे प्रमुख स्थळ असलेल्या जयस्तंभ चौकात सामना वृत्तपत्राची होळी करून निषेध करण्यात आला. अकोल्यातही शिवउद्योग आघाडीचे प्रदेश चिटणीस सुमीत पाटील आणि पंचायत समितीचे सदस्य मंगेश काळे यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.

शिवसेनेकडून इन्कार : एक खासदार व दोन आमदारांच्या राजीनाम्याच्या वृत्तास शिवसेनेने दुजोरा दिलेला नाही. जाधव यांच्या कार्यालयाने मात्र त्यास दुजोरा दिला. जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकीत असल्याचे सांगण्यात आले.

शिवसेना आज भूमिका मांडणार?

आपल्या भागात मराठा समाजाच्या प्रक्षुब्ध झालेल्या भावनांना तोंड देता यावे, यासाठी या तिघांनी राजीनाम्याचा पर्याय निवडल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेने माफी मागितल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, असे नेत्यांना वाटत आहे. यातून कसा मार्ग काढायचा, याबाबत ठाकरे यांनी काही नेत्यांशी चर्चा केली असून आज, बुधवारी पक्षाकडून भूमिका जाहीर केली जाणार असल्याचे समजते.