देसाई रुग्णालयात काम बंद आंदोलन
डॉक्टरांना संरक्षण देण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपच्याच नगरसेवकाने सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात लहान मुलाला दाखल करण्यावरुन डॉक्टरांना धमकावल्याची घटना उजेडात आली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या व्ही. एन. देसाई रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांसह सर्व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांचे अतोनात हाल झाले.
गेले तीन दिवस तापाने फणफणत असलेल्या प्रेमकुमार शर्मा (१०) या मुलाला त्याचे वडील गुरुवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास व्ही. एन. देसाई रुग्णालयात घेऊन आले. उपस्थित असलेले डॉक्टर प्रशांत यमगर यांना ते मुलाला दाखल घेण्याची विनंती करीत होते. परंतु साधा ताप असल्यामुळे तपासणी करून घरी घेऊन जाण्याची विनंती डॉक्टरांनी त्यांना केली. रुग्णालयात दाखल करुन घेण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. अखेर मुलाच्या वडिलांनी भाजप नगरसेवक महेश पारकर यांना तेथे बोलावले. महेश पारकर आणि डॉ. यमगर यांच्यामध्ये शाब्दीक चकमक उडाली. रुग्णालयात पोलिसांना पायारण करावे लागले.या घटनेमुळे संतप्त झालेल्या रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचारी म्युनिसिपल मजदूर युनियन, म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेना आदी कामगार संघटनांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी काम बंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे रुग्णांची परवड झाली. अशा घटना भविष्यात घडू नयेत म्हणून महेश पारकर यांच्याविरुद्ध प्रशासनाने एफआयआर दाखल करावा, अशी मागणी कामगार संघटनांकडून करण्यात आली आहे. प्रशासन मागणी करीत नाही तोपर्यंत आंदोलन करण्यात येईल असा इशाराही युनियनकडून देण्यात आला आहे.