हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली असून गेल्या दहा वर्षांपासून सत्तेवर असलेल्या काँग्रेसला आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय राष्ट्रीय लोकदल (आयएनएलडी) पक्षाला धूळ चारली आहे. त्यामुळे हरयाणात प्रथमच स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत हरयाणात भाजपने आठ जागा लढविल्या होत्या त्यापैकी सात जागा भाजपने पटकाविल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झालेल्या भाजपने विधानसभा निवडणुकीत स्वबळावर ९० पैकी ४७ जागा पटकाविल्या आहेत. सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या संख्याबळापेक्षा भाजपने एक अधिक जागा मिळविली आहे.
हरयाणातील ९० पैकी भाजपने ४७, काँग्रेसने १५, आयएनएलडीने १९, एचजेसी-बीएलने दोन, शिरोमणी अकाली दल आणि बसपने प्रत्येकी एक आणि अपक्षांनी पाच जागा जिंकल्या आहेत. हरयाणा राज्याच्या स्थापनेपासून भाजपने प्रथमच लक्षणीय कामगिरी केली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले होते.
हरयाणातील काँग्रेसची दहा वर्षांची सत्ता भाजपने उलथून टाकली.  हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा प्रस्थापितांच्या विरोधात होणारे मतदान थोपवण्यात अयशस्वी ठरले. गेल्या निवडणुकीत ४० जागा पटकाविणाऱ्या काँग्रेसला या वेळी केवळ १५ जागांवर समाधान मानावे लागले.
हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांच्यासाठी करा किंवा मरा अशा प्रकारची ही निवडणूक होती. मात्र त्यांना सहानुभूतीचा लाभ उठविता आला नाही.
शिक्षक भरती घोटाळ्यात कारागृहाची हवा खात असलेल्या चौताला यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. तरीही त्यांना पक्षकार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावता आले नाही. त्यांच्या पक्षाला १९ जागांवर समाधान मानावे लागले.
हरयाणा – पक्षीय बलाबल
 भाजप – ४७, बसपा – १, काँग्रेस – १५, एचजेसी-बीएल – २, आयएनएलडी – १९, शिरोमणी अकाली दल – १, अपक्ष – ५.