जागावाटपाच्या तिढ्यावरून राज्यातील शिवसेना, भारतीय जनता पक्षाची युती तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपने शिवसेनेला जागावाटपासंदर्भात दिलेला अल्टिमेटम शिवसेना नेत्यांनी धुडकावून लावला आहे. आम्ही वेळेचं कुठलंही बंधन मानत नाही आणि मानणार नाही त्यामुळे अशाप्रकारच्या कोणत्याही अल्टिमेटमला शिवसेना जुमानत नाही अशी प्रतिक्रिया सेनानेते रामदास कदम यांनी दिली. ‘मातोश्री’वर झालेल्या शिवसेना नेत्यांच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. 
दरम्यान, महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. त्यामुळे सन्मानजनक जागावाटप झाले पाहिजे. नाहीतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे जो निर्णय घेतील त्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र असेल. अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार उध्दव ठाकरेंना आहेत. प्रत्येक शिवसैनिक त्यांच्या पाठिशी उभा आहे. असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
 जागावाटपाचा तिढा लवकर सोडवा, नाहीतर आम्ही युती तोडू असा इशारा भाजपच्या वरिष्ठांनी दिला होता. स्वसन्मानाशी पक्ष कोणतीही तडजोड करणार नसल्याचे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीसुद्धा गुरुवारी सकाळी कोल्हापूरमध्ये सांगितले होते. त्याचबरोबर कोल्हापूरमधील मेळाव्यातही अमित शहा यांनी भाजपला सत्तेवर आणा, असे आवाहन केले होते. त्यांनी महायुतीचा उल्लेख टाळला होता.
भाजपने शिवसेनेपुढे विधानसभेच्या १३५ जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, शिवसेनेकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्त्वाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जागावाटपाचा तिढा लवकरात लवकर सोडविण्याचे सांगितले आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत जागावाटपाचा तिढा सोडवा, नाहीतर आम्ही युती तोडू, असा अल्टिमेटमच भाजपच्या नेत्यांनी दिला असल्याचे वृत्त ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिले होते. परस्पर सामंजस्याने आणि दोन्ही पक्षांचा योग्य सन्मान राखून जागा वाटप झाले पाहिजे, असा पवित्रा भाजपने घेतला आहे.
जागावाटपाबाबत भाजपकडून दिल्या जाणाऱया फॉर्म्युलाला शिवसेनेकडून कोणताच प्रतिसाद दिला जात नाही. यामुळे भाजपचे नेते नाराज झाले असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.