प्रभाग समितीने अध्यक्षपद पटकावण्यासाठी काही ठिकाणी मनसे-काँग्रेस, मनसे-राष्ट्रवादी, शिवसेना-भाजपा-मनसे अशा युती झाल्या होत्या. मात्र ‘एन’ प्रभाग समितीत सेनेला विश्वासात न घेता भाजपने राष्ट्रवादीची साथ दिल्याने एकच भडका उडाला.
पालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी १६ व १७ एप्रिल रोजी निवडणुका झाल्या. प्रभाग समितीतील नगरसेवकांच्या संख्येनुसार युती आघाडीची गणिते बदलत असतात व अनेकदा राज्यपातळीवर धक्कादायक वाटणाऱ्या युती-आघाडय़ा होऊन अध्यक्षपदाचा निकाल लावला जात असतो. यातच घाटकोपर येथील एन वॉर्ड प्रभाग समितीत आणखीनच चक्रावणारा प्रकार घडला. या समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपाच्या नगरसेविका रितू तावडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हारून खान यांनी अर्ज भरला होता. तावडे यांना सेनेचा तर राष्ट्रवादीला मनसेचा पाठिंबा होता. पण आयत्यावेळी रितू तावडे यांनी अर्ज मागे घेतला व हारून खान बिनविरोध निवडून आले. मात्र याबाबत सेनेच्या नगरसेवकांना विश्वासात घेतले गेले नसल्याने जोरदार वादावादी झाली. या वादावादीचा प्रभाव येथील खासदार किरीट सोमय्या यांच्या मतदानावर होतोय का, ते लवकरच दिसेल.