नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेला दुय्यम ठरवणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरून भाजपमध्ये तीव्र नाराजी उमटत आहे. मोदींच्या नेतृत्वाला कमी लेखण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सहन न करता जागावाटपाच्या वाटाघाटी थांबविण्याची मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तर समसमान जागावाटप करण्याची भाजपची मागणी शिवसेनेने धुडकावून लावल्याने शिवसेना-भाजप युती तुटण्याच्या वाटेवर आली आहे. युती ठेवायची की नाही, याबाबत निर्णय घेण्यासाठी भाजपचे अध्यक्ष सोमवारी नवी दिल्लीत बैठक घेणार आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता भाजपच्या सूत्रांनी वर्तवली आहे.
जागावाटपावरुन शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष सुरू असताना एका खासगी दूरचित्रवाणीवाहिनीच्या कार्यक्रमातील ठाकरे यांच्या वक्तव्यावरुन युतीमध्ये पुन्हा ठिणगी पडली आहे. ठाकरे यांनी ‘अशा अनेक लाटा आम्ही पाहिल्या, मोदी यांची लाट अन्य राज्यात नव्हती. आमचाही महत्वाचा वाटा असल्याने लोकसभेत विजय मिळविला,’ असे स्पष्ट मत व्यक्त केले होते. त्यावरून भाजपमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ठाकरे यांच्या वक्तव्याला प्रसिध्दीमाध्यमातून ठळक प्रसिध्दी मिळाल्याने भाजप नेत्यांची बैठक झाली. जागावाटपाच्या वाटाघाटी थांबविण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली असून त्यांचा दबाव पक्षावर वाढत आहे. त्यामुळे सध्या वाटाघाटी थांबल्या असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिली. शिवसेनेने लोकसभा निवडणुकीनंतर अनेकदा मोदी यांच्या लाटेच्या मुद्दय़ावरुन टीका केली आहे. हे वारंवार होत असून ‘सामना’ या मुखपत्रातूनही अनेकदा भाजप विरोधी लिखाण केले जात आहे. हे आता सहन केले जाणार नाही, असे भांडारी यांनी स्पष्ट केले.
‘जुनेच सूत्र राबवणार’
*मोदींवरील टीका भाजपचे प्रतिष्ठेचा मुद्दा केला असताना शिवसेनेने मात्र त्याची काडीमात्र दखल घेतलेली नसून त्यांच्या वक्तव्याची दखल घेणेही टाळले आहे.  
*‘कोण हे भांडारी, त्यांचे वक्तव्य, ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का? भाजप जेव्हा हा मुद्दा उपस्थित करेल, तेव्हा पाहू, ’ असे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले.
*भाजपशी जागावाटपाची चर्चा सुरळीत सुरू आहे. जागावाटपाच्या जुन्याच सूत्रानुसार भाजपसह घटकपक्षांना जागा दिल्या जातील आणि कोणताही दबाव सहन केला जाणार नाही, असे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले.
लहान-मोठा नाही, सारखेच!
भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी १३५ जागा लढवाव्यात असा प्रस्ताव आम्ही ठेवला आहे, असे भाजपचे महाराष्ट्राचे प्रभावी राजीव प्रताप रुडी यांनी रविवारी पुण्यात सांगितले. राज्यात शिवसेना मोठा भाऊ असल्याच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्यांबाबत विचारले असता रुडी म्हणाले, ‘छोटा भाऊ, मोठा भाऊ असे काहीही नाही. देशातील आणि राज्यातील परिस्थितीही काळानुरूप बदलत गेली आहे. दोन्ही पक्ष समान आहेत.’ राज्यात नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठे आकर्षण आहे, हे कुणीच नाकारू नये,’ असा टोलाही रुडी यांनी शिवसेनेला लगावला.
शिवसेनेकडून भाजपच्या जागांवर मुलाखती
शिवसेनेने उत्तर महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागांवर इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. उत्तर महाराष्ट्रातील ११ जागांपैकी शिवसेनेकडे ६ व भाजपकडे ५ जागा आहेत. भाजपकडे असलेल्या जागांवरही उमेदवारांच्या मुलाखती घेतल्याने शिवसेनाही स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी करीत असल्याचे मानले जात आहे.