शिवसेना आणि भाजपमधील वाद दिवसेंदिवस शिगेला पोहचताना दिसत आहे. दसरा मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना बापट यांनी संख्याबळानुसार भाजपच युतीतील मोठा भाऊ असल्याचा पुनरूच्चार केला. शिवसेना लहान-मोठा भाऊ असे काहीही मानत नाही, कारण शिवसेना बाप आहे आणि बापापुढे झुकावचं लागतं, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती. सेनेच्या या आरोपांना बापट यांनी आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान प्रत्युत्तर दिले. सध्याच्या संख्याबळाच्या समीकरणांनुसार भाजप हा मोठा भाऊ आहे, हे आता शिवसेनेने मान्य करावे. लोकशाहीत राजकीय पक्षांचे मुल्यमापन करण्याची हीच पद्धत आहे. १९९५ साली सेनेच्या जागा जास्त होत्या, आणि ते आम्हाला लहान भाऊ म्हणायचे, तेव्हा आम्ही विरोध केला नाही. आता त्यांनी विरोध करू नये. शिवसेनेने हे वास्तव स्विकारले पाहिजे, असा सल्ला बापट यांनी दिला. शिवसेना आणि भाजप एकत्र सरकार चालवत आहे. त्यामुळे या विषयावरून भविष्यात वाद टाळले पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशामुळे संख्याबळाच्यादृष्टीने शिवसेनेची उपयुक्तता कमी झाली होती. त्यामुळे युतीतील मोठा भाऊ कोण, हा प्रश्न नव्याने उपस्थित झाला होता. त्यावरूनच गेले काही दिवस सेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे.