भाईंदरमध्ये भाजपची माघार, मुंबईत मात्र आमदार आग्रही

पर्युषण काळात आठवडाभर मांसविक्री बंदीचा भाजपची सत्ता असलेल्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेचा निर्णय गेल्या वर्षी वादग्रस्त ठरला असतानाच यंदा मुंबईत याच काळात आठवडाभर कत्तलखाने बंद ठेवण्याची मागणी भाजप आमदाराने केल्याने पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. गत वेळचा अनुभव लक्षात घेता यंदा मीरा-भाईंदरमध्ये मात्र शासकीय नियमाप्रमाणे केवळ दोन दिवसच मांसविक्री बंद ठेवली जाणार आहे.

जैन बांधवांचा पर्युषण काळ आणि गणेशोत्सवात प्रत्येकी चार दिवस असे एकूण आठ दिवस मुंबईमधील कत्तलखाने बंद ठेवावे, अशी मागणी भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. गेल्या वर्षी मीरा-भाईंदरमध्ये भाजपच्या पुढाकाराने आठवडाभर मांसविक्री बंदीचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची राजकीय प्रतिक्रिया उमटून मराठी विरुद्ध जैन, असा वाद निर्माण झाला होता. या पाश्र्वभूमीवर यंदाही पर्युषण काळात मांसविक्री बंदीवरून वाद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

जैन समाजाचा पर्युषण काळ पवित्र मानला जातो. या काळामध्ये जैन बांधव उपासतापास करीत असतात. त्यामुळे या काळात चार दिवस कत्तलखाने बंद ठेवावे, अशी मागणी पुरोहित यांनी केली आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवामध्येही कत्तलखाने चार दिवस बंद ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे. पुरोहित यांच्या मागणीला काँग्रेस, मनसे आणि समाजवादी पक्षाने विरोध दर्शविला आहे.

भाईंदरमध्ये दोनच दिवस बंदी

आठवडाभर मांसविक्री बंद ठेवण्याच्या मीरा-भाईंदर महापालिकेच्या निर्णयाने गेल्या वर्षी राज्यभर वाद झाला होता. या पाश्र्वभूमीवर यंदा शासकीय नियमाप्रमाणे फक्त दोनच दिवस मांसव्रिकी बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. काही नगरसेवकांनी आठ दिवस बंदीची मागणी पुढे रेटण्याचा प्रयत्न सर्वसाधारण सभेत केला होता.

दरवर्षी पर्युषण कळात पशुवधगृह बंद ठेवण्याची मागणी करीत भाजप राजकारण करीत आले आहे. आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपचेच सरकार आहे. पालिका आयुक्तांकडे मागणी करण्याऐवजी पर्युषण काळात कत्तलखाने बंद ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश काढावा.

प्रवीण छेडा, विरोधी पक्षनेते

पर्युषण काळाबाबत आम्हाला आदर आहे. पण रमजानच्या पवित्र महिन्यात आम्ही इतर धर्मीयांना रोजा ठेवायला सांगत नाही. तसेच नमाज पठणाची इतरांवर जबरदस्तीही करीत नाही. मग देवनार पशुवधगृह बंद ठेवण्याची मागणी करीत भाजप नेते मांसाहारींवर अन्याय करीत आहेत.

रईस शेख, गटनेते, समाजवादी पार्टी

भारतीय जैन पक्षाची (भाजप) पुन्हा एकदा ‘वेज’पंची सुरू झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत पर्युषण काळात पशुवधगृह चार दिवस बंद ठेवू देणार नाही. या मागणीला गेल्या वर्षीप्रमाणेच कडाडून विरोध केला जाईल.

संदीप देशपांडे, गटनेता, मनसे