मंत्र्यांकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप
मतदारसंघातील कामे होत नसल्याने सत्ताधारी भाजपच्या आमदारांमध्ये खदखद वाढली असून, पक्षाच्याच काही मंत्र्यांच्या विरोधात आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या आठवडय़ात विदर्भातील काही आमदारांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्याचे समजते. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांमधील नाराजी समोर आली आहे.
विधानसभेत शेवटच्या दोन रागांमध्ये बसणारा विदर्भातील भाजप आमदारांचा गट अधिक आक्रमक झाला आहे. हे सर्व तरुण आमदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. मतदारसंघातील कामे मार्गी लागत नसल्याने आमदारांमध्ये असंतोषाची भावना वाढीस लागली आहे. भंडारा जिल्ह्यातील एका आमदाराच्या पुढाकाराने स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली. या पत्रावर २५ ते ३० आमदारांच्या स्वाक्षऱ्या होताच एका ज्येष्ठ मंत्र्याला त्याचा सुगावा लागला आणि धावपळ सुरू झाली. पक्षाच्या काही ज्येष्ठ मंत्र्यांकडून अजिबात सहकार्य मिळत नाही, असा या आमदारांचा आक्षेप आहे.
मतदारसंघातील कामे मार्गी लागत नसल्यानेच आमदारांमध्ये काहीशी नाराजी पसरल्याचे आमदारांचे म्हणणे आहे. मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांची यादी सादर केली होती, पण अर्थसंकल्पात या रस्त्यांचा समावेश करण्यात आला नाही. जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे कसे जायचे, असे भाजपच्या एका आमदाराने स्वत:चे नाव जाहीर करू नये या अटीवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

सर्व आलबेल : श्रीकांत भारतीय आमदारांच्या नाराजीची वाच्यता होऊ नये
म्हणून मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारतीय यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. भारतीय यांनी मात्र आमदारांमध्ये अशी काही नाराजी असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. सर्व काही आलबेल असल्याचा दावा भारतीय यांनी केला.

सेना आमदारही नाराज
* सरकारमध्ये असूनही कामे होत नसल्याने सेनेच्या आमदारांमध्येही नाराजीची भावना आहे. सत्तेत असल्याने बोलताही येत नाही, अशी विचित्र परिस्थिती त्यांची झाली आहे.
* सेना मंत्र्यांमध्ये सुप्त अंतर्गत संघर्ष आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्यातून विस्तवही जात नाही.
* दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांच्याकडे आमदारांचा फारसा राबता दिसत नाही. रामदास कदम आणि एकनाथ शिंदे या दोन मंत्र्यांकडे मात्र आमदारांची ऊठबस सुरू असते.
* आमदारांची कामांसाठी गटनेते या नात्याने एकनाथ शिंदे हे समन्वयकाची भूमिका बजावीत असतात.