आमदारपतीने भेट दिलेली लँबोर्गिनी कार घेऊन निघालेल्या महिलेने त्याच गाडीने एका रिक्षेला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी लँबोर्गिनीच्या धडकेत रिक्षेच्या हेडलाईटचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी त्यांची पत्नी सुमन यांना भगव्या रंगाची साडे पाच कोटींची लँबोर्गिनी कार वाढदिवशी भेट म्हणून दिली. २७ ऑगस्ट रोजी सुमन मेहता त्यांची महगाडी कार घेऊन फेरफटका मारायला निघाल्या. मात्र सेव्हन इलेव्हन ऍकेडमीजवळ येत असताना सुमन मेहता यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडीने रस्त्यालगत थांबलेल्या रिक्षेला धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला.
अपघाताचे वृत्त समजताच नरेंद्र मेहता हे घटनास्थळी दाखल झाले. अपघातात रिक्षेचे किरकोळ नुकसान झाले होते. नरेंद्र मेहता यांनी रिक्षाचालकाला नुकसानाची भरपाई दिली. सध्या मेहता यांची लँबोर्गिनी घटनास्थळपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शाळेत पार्क करण्यात आली आहे. माझ्या पत्नीला १८ वर्षांपासून गाड्या चालवण्याचा अनुभव आहे. तिने ऑडी आणि अन्य विदेशी बनावटीच्या गाड्याही चालवल्या आहेत असे नरेंद्र मेहता यांनी सांगितले. लँबोर्गिनी रिक्षेला फक्त चाटून गेली. यात कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.लँबोर्गिनी कोणालाही दुरस्त करता येत नाही, त्यामुळे सध्या ही गाडी शाळेच्या आवारातच ठेवली आहे असे त्यांनी म्हटले आहे.